‘शरद पॅटर्न’ विद्यार्थ्यांना घडविण्यासोबत संस्कारांची शिदोरी देतो- अनिल बागणे

‘शरद पॅटर्न’ विद्यार्थ्यांना घडविण्यासोबत संस्कारांची शिदोरी देतो- अनिल बागणे

यड्राव (प्रतिनिधी) : ''विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्याचे ध्येय न ठेवता, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. तंत्रज्ञान आणि उद्योगाचे ज्ञान महत्त्वाचे आहेच; मात्र त्यासोबत चांगले संस्कार, नम्रता, मेहनत आणि सातत्य यांची जोड असेल तरच जीवनातील यशाचा मार्ग सुकर होतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत संस्कारांची जोड देणारा ‘शरद पॅटर्न’ आहे." असे प्रतिपादन शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले. ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थींच्या स्वागत समारंभात बोलत होते.

अनिल बागणे पुढे म्हणाले, ''विद्यार्थी हा संस्थेच्या वाटचालीचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून त्यांना योग्य दिशा देण्यावर संस्थेचा भर आहे. त्यामुळे शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगविश्वाचा अनुभव मिळावा, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी पुरेशी नाही. विद्यार्थ्यांच्या हातात कौशल्य असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानातील बदल स्वीकारून त्याचा प्रत्यक्ष वापर करता आला पाहिजे. त्यातूनच चांगल्या कंपनीत नोकरी मिळविण्याबरोबरच स्वतःचा उद्योग उभारण्याची क्षमताही निर्माण होईल. शरद पॅटर्न’मधून विद्यार्थ्यांना शिक्षण, कौशल्य, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि संस्कार यांचा समन्वय साधून आत्मविश्वासाने भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास तयार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बाहुबली संगमे यांनी महाविद्यालयाची माहिती दिली. तसेच पुढील चार वर्षे विद्यार्थ्यांने काय करायचे याचा कानमंत्र दिला. सर्व विभाग प्रमुख यांनी महाविद्यालय व विभागाची माहीती दिली. यावेळी प्रवेश घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व डिन, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थीत होते. स्वागत प्रथमवर्ष विभाग प्रमुख डॉ. एस. वाय. साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. स्मिता परमाज यांनी केले. आभार प्रा. अपूर्वा बापट यांनी मानले.