मेतके येथील बाळुमामा संस्थानने स्वीकारली नऊ अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी ; जि. प. शाळेत नेमले पाच शिक्षक
कोल्हापूर/प्रतिनिधी : कागल तालुक्यातील मेतके येथील सद्गुरू बाळुमामा चॅरिटेबल ट्रस्टने धार्मिक कार्यासोबत सामाजिक दायित्व जपत महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. कोल्हापूर येथील बालकल्याण संकुलातील नऊ अनाथ मुलींच्या शिक्षणासह आहार, पोशाख व शैक्षणिक साहित्याचा खर्च ट्रस्टने स्वीकारला आहे. याशिवाय मेतके येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी पाच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मेतके येथे सद्गुरू बाळुमामा यांनी स्थापन केलेल्या मंदिराचा ट्रस्ट २००५ मध्ये स्थापन झाला. त्यानंतर मंदिर, भक्तनिवास आणि अन्नछत्राची उभारणी करण्यात आली. धार्मिक उपक्रमांबरोबरच समाजोपयोगी कार्य करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे.
ट्रस्टकडून यापूर्वी सात अनाथ मुलींच्या संगोपनासाठी मदत केली जात होती. यंदा आणखी दोन मुलींची जबाबदारी स्वीकारण्यात आल्याने आता एकूण नऊ मुलींना मदत मिळणार आहे. त्यांच्या शालेय साहित्य, पोशाख, आहार आणि अन्य गरजांसाठीचा धनादेश बालकल्याण संकुलच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
मेतके येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता. ही बाब लक्षात घेऊन ट्रस्टने स्वतःच्या खर्चातून पाच शिक्षकांची नियुक्ती केली आहे. तसेच शाळेतील शैक्षणिक सुविधा आधुनिक करण्यासाठी संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
“आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यासोबत समाजसेवेला प्राधान्य देण्याचा ट्रस्टचा प्रयत्न आहे. भक्तीला सेवेशी जोडण्याच्या उपक्रमातील हे पहिले पाऊल असून, भविष्यात आणखी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील,” असे ट्रस्टचे कार्याध्यक्ष पापा पाटील-कौलवकर यांनी सांगितले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, कार्याध्यक्ष पापा पाटील-कौलवकर, सदस्य दयानंद पाटील, बळीराम मगर, देवाप्पा पुजारी, पद्मजा तिवले, बाबासाहेब पाटील तसेच बालकल्याण संकुलचे अधीक्षक पंडित डवरी, शरयू मोरे, नजीरा नदाफ, अश्विनी आवळे, मोहिनी तोरस्कर आदी उपस्थित होते.




