शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवा; ‘मग निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आधारच राहणार नाही’, ठाकरेंच्या वकिलांचा युक्तिवाद
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेत जाऊन अपात्र ठरवू शकते का, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला होता. यावर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी महत्त्वाचा युक्तिवाद केला आहे. काही परिस्थितींमध्ये आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार केवळ विधानसभा अध्यक्षांपुरता मर्यादित नसून न्यायालयही त्याबाबत निर्णय घेऊ शकते, असा दावा कामत यांनी केला.

आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होण्याआधीच निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय दिला. त्याचा पुढील प्रक्रियेवर परिणाम झाल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाची योग्य पद्धतीने हाताळणी केली नसल्याचेही कामत यांनी म्हटले.
आमदारांनी मूळ पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला होता. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवायला हवे होते, असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेले निर्णय यापूर्वीही न्यायालयांनी बदलले असल्याची विविध उदाहरणे त्यांनी न्यायालयासमोर मांडली.निवडणूक आयोगाने विधिमंडळातील बहुमताच्या आधारे शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह दिले. मात्र, पक्षांतरबंदी कायद्यानुसार शिंदेंसोबत गेलेले आमदार अपात्र ठरतात, असा दावा ठाकरे गटाने केला.
शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी त्यावेळी पक्षत्याग केला होता की नाही, याचा अंतिम निर्णय घेण्याची गरज असल्याचे कामत यांनी म्हटले. “जर त्यांनी पक्षत्याग केला असल्याचे सिद्ध झाले, तर न्यायालय आजही त्यांना अपात्र ठरवू शकते. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा आधारच उरणार नाही,” असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला.त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आणि निवडणूक आयोगाने पक्ष-चिन्हाबाबत दिलेला निकाल यांचा परस्पर संबंध काय, यावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




