डीकेटीईच्या भाग्यश्री खाडे हिचा ‘इंडिया इटमे टेक्नीकल अॅवॉर्डस २०२५’ ने सन्मान
इचलकरंजी (प्रतिनिधी)- डीकेटीई सोसायटीच्या टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजी येथील विद्यार्थीनी फॅशन टेक्नॉलॉजी मधील भाग्यश्री खाडे हिने जागतिक स्तरावर उल्लेखन्नीय यश संपादन केले आहे. केंदाळ पासून सॅनिटरी पॅड निर्माण करण्याच्या तिच्या संशोधन कार्याची दखल घेत तिला इंडिया इटमे टेक्नीकल अॅवॉर्डस २०२५ अंतर्गत विद्यार्थी गटातील बेस्ट इको डिझाईन अवॉर्ड प्रदान करण्यात आला. या प्रतिष्ठित पुरस्काराअंतर्गत तिला रुपये दीड लाख रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. हे संशोधन डॉ अश्विनी रायबागी यांच्या मार्गदर्शनाखाली साकारले असून या संशोधनाचा मुख्य उददेश पाणी संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि महिलांच्या आरोग्याशी संबंधित स्वच्छता समस्यांवर शाश्वत उपाय शोधणे हा आहे यादृष्टिकोनातून तिची बांधिलकी या पुरस्कारातून अधोरेखित झाली आहे.

भाग्यश्री हीने इचलकरंजीतील पंचगंगा नदीवरील केंदाळ घेवून त्यापासून तंतूची निर्मिती केली आणि या तंतूपासून पर्यावरण पूरक असे सॅनिटरी पॅड बनवून त्याची अत्याधुनिक मशिनीवर गुणवत्ता चाचणी केली तयार झालेले सॅनिटरी पॅड हे पर्यावरण पूरक असून वापरण्यास उत्तम दर्जाचे आहे असे संशोधनातून निष्कर्षास आले आहे त्यामुळे हिच्या संशोधनाला प्रथम क्रमांकाचे पारितोषीक देवून गौरविण्यात आले आहे.
इंडिया इंटरनॅशनल टेक्स्टाईल मशिनरी एक्झीबिएशन सोसायटी (इटमे) ही संस्था जागतिक पातळीवरील अत्याधुनिक वस्त्रोद्योग यंत्रसामुग्री उत्पदकांची अग्रगण्य संस्था असून, विद्यार्थ्यांच्या संशोधन क्षमतेला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन स्पर्धा आयोजित करते. सदर पुरस्कार सोहळा ताज पॅलेस, कोलाबा, मुंबई येथे दिमाखात पार पडला. यावेळी भारत सरकाच्या खादी आणि ग्रामीण इंडस्ट्री कमिशन च्या सिईओ रुपराशी महापात्रा, रोझारी बायोटेकचे एक्झुकिटीव्ह चेअरमन, एडवर्ड मेनझेस आणि वर्धमान टेक्स्टाईल, जॉईट मॅनेजर डायरेक्टर नीरज जैन तसेच टेक्स्टाईल उदयोग क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ञ व संशोधकांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. विशेष म्हणजे, याच संशोधनासाठी भाग्यश्री हिला यापूर्वी इटालियन टेक्नॉलॉजी अवॉर्डस कार्यक्रम २०२५ अंतर्गत इटालियन ट्रेड एजन्सी आयटीए व अॅसिमिट यांच्या सहकार्याने इटली येथे गौरविण्यात आले आहे.
डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त, संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील यांनी भाग्यश्रीचे अभिनंदन केलेे.




