पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; भरधाव इनोवाच्या धडकेत तिघांचा मृत्यू

पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; भरधाव इनोवाच्या धडकेत तिघांचा मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) - पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल चौकात आज पहाटे सुमारे पाचच्या सुमारास भरधाव इनोवा कारने तिघांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघेही जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातात दिलीप आण्णाप्पा पवार (वय ६५, रा. वळीवडे रोड, गांधीनगर), सुधीर कमलाकर कांबळे (वय ४१, रा. आटपाडी, सांगली) आणि विनय सिंग गौड (वय२७, रा. मध्यप्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे शेकोटी करून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिघांना भरधाव इनोवा कारने जोरदार धडक दिली. धडकेमुळे तिघेही गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. कोल्हापूरहून पुणे व मुंबईकडे जाणारे प्रवासी पहाटेच्या सुमारास तावडे हॉटेल चौकात थांबत असल्याने हा परिसर गजबजलेला असतो. तसेच मुंबई, पुणे व बेळगावकडून येणारी वाहने याच चौकातून जात असल्याने येथे मोठी वाहतूक असते.

या गजबजलेल्या चौकात घडलेल्या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या कारचा चालक व वाहनाबाबत अधिक तपास सुरू असून पुढील कारवाई शाहूपुरी पोलीस करीत आहेत.