सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उचल विना कपात ३४०० रूपये - मंत्री हसन मुश्रीफ
कागल (प्रतिनिधी) - सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उचल प्रतिटनाला विनाकपात ३४०० रुपये देणार असल्याची घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. साखर कारखान्याच्या बाराव्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या हंगामात आठ लाख टन ऊस गाळपाचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.

बेलेवाडी काळम्मा ता. कागल येथे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या बाराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ ऊसमोळी टाकून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ आदी मान्यवरांच्या हस्ते झाला.
भाषणात मंत्री मुश्रीफ म्हणाले, घटतच चाललेले एकरी ऊस उत्पादन ही चिंतेची बाब आहे. आम्ही कारखान्याची विस्तारवाढ करणार आहोत. परंतु; ऊस कुठून आणणार, असा सवाल करतानाच ते पुढे म्हणाले, कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप करणे हाच एकमेव पर्याय आहे. साखर कारखानदारी प्रतिकूल परिस्थितीतून जात आहे असे सांगताना ते म्हणाले, एफआरपी वाढते परंतु; साखरदर वाढत नाही. गळीत हंगाम अवघे १०० दिवस चालतो हे साखर कारखान्यांना परवडणारे नाही. कामगारांच्या बहुतांशी मागण्या पूर्ण केल्या असल्याचे सांगून श्री. मुश्रीफ म्हणाले, त्रिपक्षीय करारानुसार दहा टक्के पगारवाढही लागू करणार आहोत.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उभारणी सभासद शेतकऱ्यांच्या जिद्द आणि संघर्षातून झालेली आहे. या कारखान्याने चांगला दर, रोजगार, नावलौकिक, वेगळेपण आणि नाविन्यता जपलेली आहे.
स्वागतपर भाषणात कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, या हंगामात आठ लाख टन गाळप, अडीच कोटी लिटर्स इथेनॉल उत्पादन आणि आठ कोटी युनिट्स वीज निर्मिती ही उद्दिष्टे आहेत. शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्वच्या सर्व गाळपासाठी कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे.
ऊस उत्पादनवाढीची शपथ घ्या.....!
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ए. आय. म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे ऊस उत्पादन एकरी सव्वाशे ते दीडशे टन होते हे आता प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. ए. आय.च्या जोरावर एकरी उत्पादन वाढ हाच एकमेव पर्याय आहे. एकरी उत्पादन वाढले तरच शेती परवडेल आणि साखर कारखानदारी चालेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊस उत्पादनवाढीचा संकल्प करा आणि शपथ घ्या, असेही ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजिसिंह पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, बाजार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, शशिकांत खोत, दिनकरराव कोतेकर, विकास पाटील, बाळासाहेब तुरंबे, पैलवान रवींद्र पाटील, आर. व्ही. पाटील, शामराव पाटील, संजय चितारी, मारूतराव घोरपडे, रणजीत सूर्यवंशी, मयूर आवळेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केले. प्रास्ताविक जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे यांनी केले. सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी केले. आभार डिस्टिलरी मॅनेजर संतोष मोरबाळे यांनी मानले.




