कोल्हापुरातील दोन खासगी रुग्णालयांचा 'सीजीएचएस' योजनेत समावेश; खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापुरातील दोन खासगी रुग्णालयांचा 'सीजीएचएस' योजनेत समावेश; खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर/प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रातील दोन लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेचा (CGHS) लाभ आता कोल्हापुरातच मिळणार असून, खासदार धनंजय महाडिक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शहरातील दोन नामांकित खासगी रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या यशाबद्दल अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटनेच्या वतीने खासदार महाडिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली 'सीजीएचएस' (CGHS) सुविधा कोल्हापुरात उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी मुंबई किंवा पुण्याचा फेरा मारावा लागत होता. यामुळे होणारा आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रास वाचवण्यासाठी कोल्हापुरात हे केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी टपाल कर्मचारी संघटनेने खासदार महाडिक यांच्याकडे केली होती.

या समस्येची दखल घेत खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. २१ डिसेंबर २०२२ रोजी त्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासह (अमोल शिंदे, संजय पठाडे, राजेश सारंग) तत्कालीन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर २ मे २०२३ रोजी संसदेतही त्यांनी हा प्रश्न लावून धरला.

या प्रयत्नांना अखेर यश आले असून, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेसाठी कोल्हापुरातील छत्रपती ताराराणी चौकातील 'सेलक्युअर कॅन्सर सेंटर' आणि शिवाजी पार्कातील 'सनराईज हॉस्पिटल' यांची निवड झाली आहे. या दोन्ही रुग्णालयांमध्ये आता पश्चिम महाराष्ट्रातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोफत वैद्यकीय उपचार मिळतील.

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटनेने खासदार महाडिक यांचा सत्कार केला. या प्रसंगी आनंद भोगडे, मोरेश्वर देशपांडे, अभिलाष पोवार, गोपाळ देशपांडे, वल्लभ मैंदरकर, राजेंद्र पाटील, आनंद बुगडे, ज्योत्स्ना माकणकर, देवेंद्र कवडे, साक्षी बचाटे, प्रतीक्षा पाटील आणि रुपाली तांबवेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.