उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 'ठाकरे गटा'च्या ६ बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 'ठाकरे गटा'च्या ६ बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

 मुंबई: शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या ६ लोकसभेच्या खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोठी दिलासादायक बातमी दिली आहे. या खासदारांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत होणाऱ्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत मंजुरी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. यावर ठाकरे गटाने आक्षेप घेत, "मूळ पक्षाच्या मंजुरीशिवाय खासदार स्वतःहून विलीनीकरणाचा दावा करू शकत नाहीत. हा मतदारांच्या जनादेशाचा अपमान आहे," असे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले होते. तसेच दहाव्या अनुसूचीनुसार ही बंडखोरी अवैध ठरवण्याची मागणी केली होती.

परंतु, सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अवघ्या एक दिवस आधी लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर खासदारांच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला संसदेत मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.

तसेच, मूळ पक्षाच्या विरोधानंतरही लोकसभा अध्यक्षांनी ६ खासदारांचा विलीनीकरणाचा दावा मान्य केला आहे. यामुळे शिंदे गटाचे 'ऑपरेशन टायगर' आता पूर्णपणे यशस्वी मानले जात असून, संसदेत ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.