विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘विनय प्रकाश दीप योजना’ जाहीर : शिक्षण सभापती शितल यादव
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून एक अत्यंत महत्त्वाचा आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आता पुरेशा प्रकाशात आणि सुरक्षित वातावरणात शिकता येणार आहे.

शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती शीतल प्रविण यादव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शिक्षण विभागाची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील काही शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये पुरेशा प्रकाशाचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. यावर तातडीने उपाययोजना म्हणून सभापती शीतल यादव यांनी ‘विनय प्रकाशदीप योजना’ राबविण्याची घोषणा केली आहे.
काय आहे ‘विनय प्रकाशदीप योजना’?
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये १००% विद्युत प्रकाश व्यवस्था केली जाईल. जिथे गरज आहे तिथे नवीन लाईट्स बसवणे, खराब लाईट्सची दुरुस्ती करणे आणि विजेच्या सुविधेची नियमित देखभाल करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
याशिवाय, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, धोकादायक इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना बसवू नये आणि आवश्यक तिथे तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, असे कठोर निर्देशही बैठकीत देण्यात आले.
शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सेमी-इंग्रजी शाळांचा विस्तार करणे, इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष तयारी करून घेणे आणि ‘मिशन अंकुर’ उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहनही सभापतींनी केले आहे.
या बैठकीस शिक्षण समिती सदस्य एकनाथ पाटील, अमरसिंह चव्हाण, रेखाताई मुगडे, भगवान पाटील, स्नेहल वेल्हाळ, शुभांगी कुंभार, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यासह सर्व गटशिक्षणाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.




