उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करा"; मुंबईतील आंदोलनावर आक्षेप घेत ॲड. गुणरत्न सदावर्तेंची थेट पोलिसांत मागणी
मुंबई: दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मुंबईत पुकारलेल्या आंदोलनावर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बेकायदेशीर ठिकाणी आंदोलन करत असल्याचा दावा करत, सदावर्ते यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची थेट मागणी केली आहे.

राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर सध्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोठे आंदोलन सुरू आहे. गेल्या २१ दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे अन्नत्याग उपोषणाला बसले होते. प्रकृती खालावल्यामुळे सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथेही त्यांचे आंदोलन सुरूच आहे. दुसरीकडे, जंतर-मंतरवरच 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दीपके यांनीही उपोषण सुरू केले आहे. या दोन्ही आंदोलनांना देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून, त्यांच्या पक्षाच्या वतीने आज (१९ जुलै) मुंबईत एका विशेष आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. ठाकरे यांनी या आंदोलनात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. शिवतीर्थावर हे आंदोलन झालं असून यावर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेत उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मात्र, उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर आणि मुंबईतील आंदोलनावर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी कायदेशीर नियमांचा दाखला देत आक्षेप घेतला आहे. हे आंदोलन पूर्वनियोजित नियमांचे उल्लंघन करणारे आणि बेकायदेशीर जागेवर होत असल्याचा दावा त्यांनी केला असून, या प्रकरणी उद्धव ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. यामुळे या आंदोलनावरून आता नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.




