राज्य मंत्रिमंडळाचे 5 मोठे निर्णय! 177 तालुके, पुण्यात NDRF, नागपुरात नवीन कॉलेज

राज्य मंत्रिमंडळाचे 5 मोठे निर्णय! 177 तालुके, पुण्यात NDRF, नागपुरात नवीन कॉलेज

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विकास, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासनाशी संबंधित मोठे निर्णय मंजूर करण्यात आले. पाहूया त्यातील प्रमुख 5 निर्णय.

1) राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये 2026-27 या वर्षासाठी विशेष विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्याला 5 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना पुढील वर्षी अतिरिक्त प्रोत्साहन निधीही मिळणार आहे.

2) नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे नवीन शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून महाविद्यालयासाठी आवश्यक शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या पदांनाही मान्यता देण्यात आली आहे.

3) पुणे जिल्ह्यातील सदुंबरे येथे NDRF ला 3 हेक्टर जमीन विनामूल्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरूपी तळ उभारला जाणार असून आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे.

4) अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या नागपूरमधील भाडेपट्टा नूतनीकरणावरील मुद्रांक शुल्क माफ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सामाजिक आणि जनकल्याणकारी कार्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

5) लोक आयुक्त कार्यालयाच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी** देण्यात आली आहे. आता कार्यालयातील पदसंख्या 87 वरून 143 इतकी करण्यात येणार असून नवीन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.