लाजा वाटल्या पाहिजेत..प्रणित ना कलाकार, ना कॉमेडियन; 370 रुपयांच्या बिर्याणी प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा संताप

लाजा वाटल्या पाहिजेत..प्रणित ना कलाकार, ना कॉमेडियन; 370 रुपयांच्या बिर्याणी प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा संताप

मुंबई (प्रतिनिधी) : कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये झालेल्या एका वक्तव्यावरून सोशल मीडियावर प्रचंड वाद निर्माण झाला आहे. '370 रुपयांच्या बिर्याणी' संदर्भातील चर्चेमुळे प्रणित मोरे आणि त्याच्या शोवर टीकेची झोड उठली असून अनेक सेलिब्रिटींनीही नाराजी व्यक्त केली आहे.रीम शेख, कुशा कपिला आणि उर्फी जावेद यांच्यानंतर आता 'उतरन' फेम अभिनेत्री रश्मी देसाई हिनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत प्रणित मोरेवर जोरदार टीका केली आहे. इतकेच नव्हे तर त्याला कलाकार किंवा कॉमेडियन म्हणणाऱ्यांनाही तिने सुनावले आहे.

रश्मी देसाईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर संबंधित व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले, "ही कॉमेडी नाही. कोणताही आशय नसलेली ही केवळ चर्चा आहे. जेव्हा एखाद्याकडे दर्जेदार कंटेंट आणि सर्जनशीलतेचा अभाव असतो, तेव्हा तो फक्त गप्पांमध्ये वेळ घालवतो. प्रणित ना कलाकार आहे, ना कॉमेडियन."

तिने पुढे कला क्षेत्रावर होणाऱ्या टीकेबाबतही नाराजी व्यक्त केली. "कला क्षेत्राला विनाकारण ट्रोल केले जात आहे, हे खऱ्या कलाकारांसाठी दुर्दैवी आहे. त्या मुलाची नोकरी गेली आहे. प्रणित मोरेचा शोही बंद झाला पाहिजे. प्रणित मोरे आणि गुरुग्रामच्या त्या तरुणाला स्वतःच्या वर्तनाची लाज वाटली पाहिजे," असेही ती म्हणाली.

प्रणित मोरेच्या शोमध्ये 23 वर्षीय हिमांशू जांगडा याने त्याच्या एका डेटिंग अनुभवाबद्दल सांगितले होते. त्याच्या म्हणण्यानुसार, तो एका मुलीसोबत डेटवर गेला होता आणि त्यावेळी दोघांनी चिकन बिर्याणी खाल्ली होती. त्यासाठी त्याने 370 रुपये खर्च केल्याचे त्याने सांगितले.यानंतर त्या मुलीने तिला घरी सोडण्याची विनंती केली असता, "मी 370 रुपये खर्च केले आहेत, ते वसूल तर करणारच," असे आक्षेपार्ह वक्तव्य त्याने केले. पुढे त्याने त्या मुलीसोबतच्या खासगी क्षणांविषयीही सार्वजनिकरित्या चर्चा केली. या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली.

वाद वाढताच प्रणित मोरेने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे माफी मागितली. तसेच संबंधित व्हिडीओ हटवण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने आपले इन्स्टाग्राम अकाउंटही डिलीट केल्याची माहिती समोर आली आहे.