एकनाथ शिंदे यांचे नाव वगळल्याने नवी मुंबईत शिवसेनेचे आंदोलन; गणेश नाईकांच्या वाहनाला घेराव

एकनाथ शिंदे यांचे नाव वगळल्याने नवी मुंबईत शिवसेनेचे आंदोलन; गणेश नाईकांच्या वाहनाला घेराव

मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकृत कार्यक्रमाच्या पत्रिकेत राज्याचे उपमुख्यमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. सत्ताधारी भाजपकडून वारंवार शिंदे यांचे नाव डावलले जात असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी वाशी येथील रुग्णालय परिसरात आंदोलन केले.वनमंत्री गणेश नाईक कार्यक्रमासाठी दाखल होत असताना शिवसैनिकांनी त्यांच्या वाहनाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नवी मुंबईत गणेश नाईक आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे या घटनेतून दिसून आले.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी संताप व्यक्त केला. "कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांचे नाव नसणे ही गंभीर बाब आहे. शिवसैनिक आणि स्थानिक पदाधिकारी याला योग्य उत्तर देतील," असे त्यांनी म्हटले.दरम्यान, नवी मुंबईतील आरोग्यविषयक योजनांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडणार आहे. मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेत खासदार नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची नावे समाविष्ट करण्यात आली असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना कार्यक्रमातून डावलल्याचा आरोप करत शिवसेनेने आंदोलन छेडले असून, या घटनेमुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.