कोट्यवधींचा स्कायवॉक बेवारस; तुटलेल्या लाद्या, अस्वच्छतेने नागरिक हैराण

कोट्यवधींचा स्कायवॉक बेवारस; तुटलेल्या लाद्या, अस्वच्छतेने नागरिक हैराण

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईकरांचा प्रवास सुकर व्हावा आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून पादचाऱ्यांना सुरक्षित वाट मिळावी, या ‘उदात्त’ हेतूने मुंबईत कोट्यवधी रुपये खर्च करून स्कायवॉकचे जाळे उभारण्यात आले. मात्र, सध्या महापालिका आणि संबंधित प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे या स्कायवॉकची प्रचंड दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या लाद्या, अस्वच्छता, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि समाजकंटकांचा वावर यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पार ऐरणीवर आला आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी येथे बसवण्यात आलेले एस्केलेटर (सरकते जिने) बहुतांश वेळा बंदच असतात. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. न्यायालयाकडे जाणाऱ्या भागाचा वापर होत असला तरी म्हाडा इमारतीच्या पाठीमागे उतरणारा जिना पूर्णपणे वापराविना पडून आहे. परिणामी या भागात धूळ, कचरा आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.

एकीकडे दुरवस्था असली तरी, मुंबईतील मुसळधार पावसात रस्त्यावरील पाणी आणि वाहतूक कोंडीतून वाचण्यासाठी अनेक नागरिक अजूनही नाइलाजाने का होईना, याच स्कायवॉकचा वापर करतात. त्यामुळे हे स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी अत्यंत गरजेचे आहेत.