विद्यार्थ्यांनी काळाची गरज ओळखून अद्ययावत तंत्रकौशल्ये आत्मसात करावीत: पालकमंत्री आबिटकर; NIT उचगावमध्ये क्लाऊड कम्प्युटिंग लॅबची उभारणी
कोल्हापूर /प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्थापित 'श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस' संचलित उचगाव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (NIT) मधील 'सेंटर ऑफ एक्सलन्स'अंतर्गत ट्रान्सेन्ड एज्युटेक, पुणे यांच्या सहकार्याने नव्याने उभारण्यात आलेल्या 'क्लाऊड कम्प्युटिंग लॅब'चे उद्घाटन कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

याप्रसंगी बोलताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले, "विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण घेत असतानाच उद्योगांना अपेक्षित असणारी अद्ययावत कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज आहे. एनआयटीसारख्या शिक्षणसंस्था या क्षेत्रात पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देत आहेत, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे."
संस्कारक्षम व स्वावलंबी शिक्षणाची परंपरा - डॉ. के. जी. पाटील
संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांनी संस्थेतील विविध शाखांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारे संस्कारक्षम, स्वावलंबन प्रदान करणारे आणि आधुनिक शिक्षण याविषयी सविस्तर विवेचन केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी कॉलेजमध्ये इनोव्हेशन आणि स्टार्टअपला चालना देण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
गुणवंत विद्यार्थी आणि आयआयटीमध्ये निवड झालेल्या ओम पाटील यांचा सत्कार
कार्यक्रमादरम्यान प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशित गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील प्रा. संग्रामसिंह पाटील यांचे चिरंजीव ओम पाटील यास प्रतिष्ठित आयआयटी खडगपूर येथे प्रवेश मिळाल्याबद्दल त्याचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
राजर्षी शाहू टेक सेंटरला भेट आणि एनसीसी मानंवदना
उद्घाटनानंतर पालकमंत्री आबिटकर यांनी परिसरातील 'राजर्षी शाहू टेक सेंटर'ला भेट दिली. तेथे सोलर पॅनल निर्मितीच्या प्रक्रियेतील सर्व टप्पे त्यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांकडून प्रात्यक्षिकासह समजावून घेतले. तत्पूर्वी, महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सनी शिस्तबद्ध संचलनाने पालकमंत्र्यांना मानवंदना दिली.
या सोहळ्यास संस्थेचे व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, माजी महापौर व संचालिका सई खराडे, संचालिका सविता पाटील, सेक्रेटरी मेटील, आजीव सेवक उदय पाटील, माजी रजिस्ट्रार डॉ. नितीन पाटील, रजिस्ट्रार संदीप पंडे, विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा. मोहन शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी केले.




