आता मोदी हेच पप्पू, राहुल गांधी नाही ; संजय राऊतांचे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र

आता मोदी हेच पप्पू, राहुल गांधी नाही ; संजय राऊतांचे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यात केंद्र सरकारच्या धोरणांवर केलेल्या टिकेवरून सध्या देशातील राजकारण तापले आहे. रविवारी (२१ सप्टेंबर) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला होता. या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर शब्दांत टीका केली आहे. तसेच राहुल गांधींच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे.

राहुल गांधींचा बाण भाजपच्या काळजात आरपारराऊत
 खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "भारताच्या परराष्ट्र धोरणाची सद्यस्थिती काय आहे, हे राहुल गांधी अत्यंत सोप्या शब्दांत जनतेला समजावून सांगत आहेत. मोदींचे विदेश धोरण कसे कोसळले आहे, हे अंधभक्तांनाही आता कळू लागले आहे. याच गोष्टीची देवेंद्र फडणवीस खिल्ली उडवत असतील, तर याचा अर्थ भाजप पूर्णपणे हादरलेला आहे. राहुल गांधींना 'पप्पू' ठरवण्यासाठी या लोकांनी शेकडो कोटी रुपये खर्च केले, पण आता याच राहुल गांधींनी मोदींना 'पप्पू' ठरवले आहे. राहुल गांधींनी मारलेला बाण भाजपच्या काळजात आरपार घुसला आहे."

"देशात दोन जोकर, महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये जोकरांची फौज"
 यावेळी पंतप्रधान मोदींच्या शैलीवर टीका करताना राऊत म्हणाले की, "पंतप्रधान मोदी लोकसभेत आणि बाहेर पंडित नेहरू, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नक्कल करत अनेक कॉमेडी प्रकार करत असतात. हा काय प्रकार आहे? देशात दोन जोकर आहेत आणि महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये तर जोकरांची फौजच आहे. विरोधी पक्षाला उत्तम नट असायलाच लागते. अभिनयाचा ठेका काय फक्त मोदींनीच घेतलाय का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

फडणवीसांच्या टीकेवर उपरोधिक टोला
युपीआयबाबत विरोधक फेक नॅरेटिव्ह पसरवत असल्याच्या भाजपच्या आरोपावर बोलताना राऊत म्हणाले की, "कोणीही फेक नॅरेटिव्ह पसरवत नाही. पेट्रोल पंपचालक आणि दुकानदार जे रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, त्यांना काय कळत नाही का? देवेंद्र फडणवीसांना नेमकी समस्या काय आहे, हेच समजत नाही. कोणताही विषय समजून घेण्याच्या ते पलीकडे गेले आहेत. मला वाटते, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांना चांगल्या दवाखान्यात घेऊन जात त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत," असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.