‘कर्नाटक दुष्काळ जाहीर करू शकतं, महाराष्ट्र का नाही?’ रोहित पवारांचा सरकारला सवाल
महाराष्ट्रातील दुष्काळ जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबावर आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर करून केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला असताना महाराष्ट्र सरकार ५ ऑक्टोबरपर्यंत का थांबत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ ऑक्टोबरपासून शेतपिकांचे पंचनामे सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, सरकारच्या या भूमिकेवर विरोधकांकडून टीका होत आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर असल्याचा दावा केला आहे.

कर्नाटकचा दाखला देत सरकारला घेरले
रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, कर्नाटक सरकारने २८ ऑगस्ट रोजी १०१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर आणखी २३ तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करून केंद्र सरकारकडे एनडीआरएफच्या मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील परिस्थितीही गंभीर असून खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करण्यासाठी आणखी प्रतीक्षा करू नये, अशी मागणी पवार यांनी केली.
पवार यांनी केंद्र सरकारच्या VEDAS उपग्रह प्रणालीतील आकडेवारीचा हवाला देत महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाची कमतरता आणि पावसाचे खंड असल्याचे म्हटले आहे.
त्यांच्या दाव्यानुसार, २०३ तालुक्यांमध्ये Rainfall Deviation दिसून येत आहे. तर १४० तालुक्यांमध्ये Rainfall Deviation सोबत चार आठवड्यांचा पावसाचा खंड आणि २८० तालुक्यांमध्ये Rainfall Deviation सोबत तीन आठवड्यांचा पावसाचा खंड असल्याचे त्यांनी नमूद केले.
अशा परिस्थितीत दुष्काळ जाहीर करण्यासाठी ५ ऑक्टोबरपर्यंत वाट पाहण्याची गरज काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
‘शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका’
५ ऑक्टोबरपूर्वी पंचनामे केल्यास एनडीआरएफची मदत मिळणार नाही, असा गैरसमज निर्माण केला जात असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. दुष्काळ जाहीर करण्याचा आणि ५ ऑक्टोबरच्या पंचनाम्यांचा थेट संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला.
परतीच्या पावसामुळे काही भागात परिस्थिती सुधारली तर दुष्काळ जाहीर करण्याची गरज उरणार नाही आणि त्यामुळे सरकारी खर्च वाचेल, असा सरकारचा विचार असेल तर तो शेतकऱ्यांच्या अडचणींची थट्टा ठरेल, अशी टीका पवार यांनी केली.
सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या भावनांशी सरकारने खेळू नये, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.




