अमित शहांना पंतप्रधान होण्याची घाई, पण संघाच्या मनात वेगळीच नावे; खा. संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "अमित शहा यांना पंतप्रधान होण्याची घाई झाली आहे, म्हणूनच ते वारंवार मुंबईत येत आहेत. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मनात पंतप्रधानपदासाठी अमित शहा हे नाव नसून महाराष्ट्रातील दोन नेत्यांसह अन्य नावांचा विचार सुरू आहे," असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

अमित शहांची धडपड सुरूच, पण...
अमित शहा यांच्या दौऱ्यांवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, "या देशात एक संविधान, एक तिरंगा आणि एक कायदा असला पाहिजे, यात दुमत नाही. परंतु, याचा वापर केवळ स्वतःच्या राजकारणासाठी केला जात असल्याचा आमचा आक्षेप आहे. अमित शहा आपण संघाचा अजेंडा राबवण्यासाठी किती उपयुक्त आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, संघाच्या मनात पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेशातील एका नेत्याचे नाव आहे. या शर्यतीत अमित शहा कुठेही नाहीत. तरीही त्यांची धडपड सुरू असेल तर ती त्यांना लखलाभ ठरो."
महाराष्ट्रातील दोन नावे कोणती? चर्चा रंगली
राऊत यांनी आपल्या वक्तव्यात 'महाराष्ट्रातील दोन व्यक्ती' असा उल्लेख केला असला, तरी त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव घेणे टाळले आहे. त्यामुळे संघ आणि भाजपच्या गोटात पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणारी ही दोन नावे नेमकी कोणती, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले असल्याचा आरोप करत मोदी-शहा यांच्या महत्त्वाकांक्षेवरही राऊतांनी कडाडून टीका केली.




