आमचं आंदोलन उधळण्यासाठी गुंड पाठवण्याचा कट!"; 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या अभिजित दीपकेंचा ट्विटरवरून गंभीर आरोप
नवी दिल्ली: 'नीट' (NEET) परीक्षेत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतर येथे 'कॉक्रोच जनता पार्टी'चे शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे. मात्र, आता या आंदोलनावरून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. "आमच्या शांततापूर्ण आंदोलनात गुंड पाठवून ते उधळण्याचा कट आखला जात आहे," असा खळबळजनक आरोप कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे.

संसदेवरील मोर्चापूर्वी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न?
आपल्या ट्विटर (X) पोस्टमध्ये अत्यंत गंभीर दावा करत अभिजित दीपके यांनी लिहिले की, "आम्हाला यंत्रणेतीलच आमच्या काही खात्रीशीर सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की, जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आमच्या शांततापूर्ण आंदोलनात गुंड पाठवून आम्हाला त्रास देण्याचा आणि हे आंदोलन उधळण्याचा प्रयत्न सुरू आहे." कॉक्रोच जनता पार्टी आगामी काळात संसदेवर एक भव्य मोर्चा काढणार आहे, परंतु या मोर्चापूर्वीच हे आंदोलन दडपण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप दीपके यांनी केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये थेट कोणाचे नाव घेतले नसले, तरी त्यांचा रोख थेट सरकारकडे असल्याचे बोलले जात आहे.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा १४ वा दिवस
सोशल मीडियावरून सुरू झालेली ही डिजिटल चळवळ आता रस्त्यावरील प्रत्यक्ष आंदोलनात बदलली आहे. जंतरमंतरवरील या आंदोलनाला प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही जाहीर पाठिंबा दिला आहे. वांगचुक हे गेल्या १४ दिवसांपासून येथे आमरण उपोषणाला बसले असून, तरुणांच्या या लढ्याला त्यांची मोठी साथ लाभली आहे.

सरन्यायाधीशांचे 'ते' वक्तव्य आणि 'कॉक्रोच जनता पार्टी'चा उदय
काही महिन्यांपूर्वी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांची तुलना उपरोधाने 'कॉक्रोच' म्हणजेच झुरळांशी केली होती. सरन्यायाधीशांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी आणि त्यावर उपरोधात्मक टीका करण्यासाठी सोशल मीडियावर 'कॉक्रोच जनता पार्टी' नावाचे डिजिटल हँडल सुरू करण्यात आले होते.
तरुणांच्या बेरोजगारीच्या आणि हक्काच्या मुद्द्याला थेट हात घातल्यामुळे अवघ्या चार दिवसांतच या डिजिटल हँडलचे फॉलोअर्स देशातील भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांपेक्षाही अधिक झाले होते. सोशल मीडियावरील याच अभूतपूर्व पाठिंब्याच्या जोरावर आता या चळवळीने प्रत्यक्ष राजकीय आणि सामाजिक आंदोलनाचे रूप घेतले असून, नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.




