दिल्लीच्या राजकारणात खळबळ! खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले असून, यादरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

भेटीत नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे हेदेखील उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली, परंतु या भेटीचे नेमके विषय अद्याप गुलदस्त्यात आहेत.
याआधी घेतली होती पंतप्रधान मोदींची भेट
यापूर्वीही खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. एका बाजूला आंदोलनांचे वातावरण असताना झालेली ती भेट बरीच चर्चेत राहिली होती. त्यानंतर आता थेट अमित शाह यांच्याशी झालेली ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
पवार गट एनडीएमध्ये जाणार? चर्चांना उधाण
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील भाजप, शिंदे गट आणि शरद पवार गटाच्या नेत्यांची दिल्लीवारी वाढल्याचे दिसून येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना "शरद पवार पक्ष एनडीएत सामील होऊ शकतो, त्यामुळे तयार राहा," अशा आशयाचा संदेश दिल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे, सुप्रिया सुळे यांच्या या भेटीपूर्वी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे यांनीदेखील अमित शाहांची भेट घेतली होती. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळणार का, याकडे संपूर्ण देशाचे आणि राज्याचे लक्ष लागून आहे.




