अभिनेत्री त्रिशाबाबत वादग्रस्त विधान भोवले; तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना अटक
चेन्नई: कावेरी पाणीप्रश्नावरील आंदोलनादरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा हिच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणे तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना चांगलेच भोवले आहे. या वादग्रस्त विधानाप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी (४ ऑगस्ट) सकाळी उदयनिधी स्टॅलिन यांना चेन्नईतून ताब्यात घेऊन थेट अटक केली. पुढील चौकशीसाठी त्यांना तंजावर येथे नेण्यात आले आहे.

नेमका प्रकार काय घडला?
तंजावर येथे कावेरी पाणी वाटपाच्या मुद्द्यावरून आयोजित आंदोलनात उदयनिधी स्टॅलिन सहभागी झाले होते. सभेला संबोधित करताना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि अभिनेता थलपती विजय यांच्यावर निशाणा साधला. "मुख्यमंत्री कावेरी पाणीप्रश्नावर मौन बाळगून आहेत," असे स्टॅलिन म्हणत असतानाच, उपस्थितांमधून काही जणांनी "त्रिशा, त्रिशा..." अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.
त्यावर उदयनिधी यांनी थांबून, हसत टिप्पणी केली की, "पाणी इतरत्र पोहोचो किंवा न पोहोचो, तिथे मात्र पोहोचायला हवे... मला कावेरी म्हणायचे होते." त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यावरून गदारोळ निर्माण झाला.
भाजप आणि टीव्हीकेची तीव्र टीका
या विधानानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भाजपचे मुख्य प्रवक्ते नारायण तिरुपती यांनी उदयनिधींचे विधान अत्यंत अश्लील, अवमानकारक आणि महिलांचा आदर करणाऱ्या सभ्य समाजाला न शोभणारे असल्याचे सांगत त्यांच्या अटकेची मागणी केली होती. 'तामिझगा वेत्री कळगम' (TVK) या पक्षाच्या नेत्यांनीही या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला.
चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर आणि पोलीस तक्रारीनंतर अखेर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या संपूर्ण घडामोडींवर मुख्यमंत्री थलपती विजय यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नसली, तरी उदयनिधी यांच्या अटकेमुळे तामिळनाडूतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.




