जैशचा मोठा कट उघडकीस ; 'ऑपरेशन 313' अंतर्गत मोठी मोहीम
Operation 313 - पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश - ए - मोहम्मद पुन्हा सक्रिय होण्याच्या तयारीत असून, त्यांनी ‘ऑपरेशन ३१३’ या नावाने एक मोठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत संघटनेने सुमारे ४ ट्रिलियन पाकिस्तानी रुपये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीचा उपयोग नवीन मदरसे आणि दहशतवादी प्रशिक्षण कॅम्प उभारण्यासाठी केला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या निधीतून ३१३ मदरसे आणि अंदाजे १५० दहशतवादी प्रशिक्षण कॅम्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे कॅम्प मुख्यतः पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात असतील. विशेषतः पीओके (पाकव्याप्त काश्मीर) मध्ये यावर्षाच्या अखेरीपर्यंत ३० पेक्षा जास्त हाय-टेक मदरसे आणि कॅम्प उभारण्याचे लक्ष्य आहे.
‘ऑपरेशन ३१३’ अंतर्गत निधी संकलनासाठी वापरल्या गेलेल्या पावत्यांचे पुरावे समोर आले असून, त्यावरून हे स्पष्ट होते की प्रत्येक समर्थकाने किमान २१,००० पाकिस्तानी रुपये दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे आर्थिक सहकार्य केवळ पाकिस्तानमधूनच नाही, तर परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे. विशेषतः आखाती देश, सौदी अरेबिया, मलेशिया, युएई आणि बांगलादेश येथून कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. निधी उभारणीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्स चा वापर होत असल्याने FATF (Financial Action Task Force) या आंतरराष्ट्रीय संस्थेने या व्यवहारांवर लक्ष ठेवले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत जैश-ए-मोहम्मदवर कारवाई करत संघटनेचा अतिरेक संपवला होता. मात्र त्यानंतर, संघटनेचा प्रमुख मसूद अझहर पुन्हा संघटना उभी करण्यासाठी ‘ऑपरेशन ३१३’ सुरू केले. यासाठी सोशल मीडियावर आवाहन करत, समर्थकांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




