भारत-अफगाणिस्तान मालिकेत नेमकं काय घडलं? 19 जण अटकेत

भारत-अफगाणिस्तान मालिकेत नेमकं काय घडलं? 19 जण अटकेत

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अरुण जेटली स्टेडियम परिसरात तिकिटांची अवैध विक्री आणि रिसेलिंग करणाऱ्या तब्बल 19 जणांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत 71 क्रिकेट सामन्यांची तिकिटे आणि 7,400 रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

 

भारत-अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 13 ते 17 सप्टेंबरदरम्यान दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आली. टीम इंडियाने ही मालिका 3-0 अशी जिंकली. मात्र, मालिकेदरम्यान तिकिटांच्या काळाबाजाराचा मुद्दाही समोर आला.तिकिटांची अवैध विक्री रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी तीन दिवस विशेष मोहीम राबवली. गुप्त माहिती आणि पाळत ठेवण्याच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. काही ठिकाणी पोलिसांनी बनावट ग्राहक म्हणजेच ‘डिकॉय’ ग्राहक बनून तिकिटांची अवैध विक्री होत असल्याची खात्री केली.

दिल्ली गेट मेट्रो स्टेशन, एमजी मार्ग, बीएसझेड मार्ग, जेपीएन पार्क तसेच अरुण जेटली स्टेडियमच्या आसपासच्या परिसरात पोलिसांनी विशेष नजर ठेवली होती.पोलिसांच्या माहितीनुसार, काही आरोपींनी कमी किमतीत तिकिटे मिळवून ती चाहत्यांना जास्त दराने विकण्याचा प्रयत्न केला. अधिकृत वेबसाइटवर तिकिटे सोल्ड आऊट झाल्यानंतर अनेक चाहते कोणत्याही किमतीत तिकीट घेण्यास तयार असतात. याचाच फायदा घेत तिकिटांचा काळाबाजार केला जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले.

कोणत्या दिवशी किती कारवाई?

14 सप्टेंबर: पहिल्या सामन्यानंतर 4 एफआयआर दाखल करण्यात आल्या. 5 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 29 तिकिटे आणि 3,400 रुपये रोख जप्त करण्यात आले.

15 सप्टेंबर: दुसऱ्या सामन्याच्या दिवशी 6 एफआयआर दाखल झाल्या. 10 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 31 तिकिटे आणि 4,000 रुपये रोख जप्त करण्यात आले.

17 सप्टेंबर: तिसऱ्या सामन्याच्या दिवशी 3 एफआयआर दाखल करण्यात आल्या. 4 जणांना अटक झाली असून त्यांच्याकडून 11 तिकिटे जप्त करण्यात आली.

अशाप्रकारे तीन दिवसांच्या कारवाईत एकूण 13 एफआयआर दाखल करून 19 जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी 71 तिकिटांसह 7,400 रुपये रोख जप्त केले आहेत.