जिल्हा परिषद सदस्या शैलजा पाटील व ग्रामपंचायत गिजवणे यांच्या पुढाकारातून महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जिल्हा परिषद सदस्या शैलजा पाटील व ग्रामपंचायत गिजवणे यांच्या पुढाकारातून महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गिजवणे येथे मॅमोग्राफी, बोन डेन्सिटी, पॅप स्मिअरसह रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी

गिजवणे : गिजवणे येथे महिलांच्या आरोग्याची काळजी घेत, स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाच्या कर्करोगाचे लवकर निदान व्हावे तसेच ग्रामीण भागातील महिलांना वेळेत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद सदस्या सौ. शैलजा पाटील यांच्या पुढाकारातून ONCO Cancer & Research Center, Pune, संगोपन हॉस्पिटल आणि ग्रामपंचायत गिजवणे यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी पूर्णपणे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये महिलांसाठी स्तनाच्या कर्करोगाची मॅमोग्राफी तपासणी, बोन डेन्सिटी तपासणी, पॅप स्मिअर तपासणी तसेच रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आली. गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

महिलांचे आरोग्य हीच कुटुंबाच्या आणि समाजाच्या आरोग्याची खरी ताकद आहे, या विचारातून सौ. शैलजा पाटील यांनी हा उपक्रम राबवून ग्रामीण महिलांच्या आरोग्याला प्राधान्य दिले आहे. अशा आरोग्यविषयक उपक्रमांमुळे महिलांना विविध आजारांचे लवकर निदान होऊन वेळेत योग्य उपचार घेण्यास मदत होणार आहे.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या शैलजा पाटील, संगोपन हॉस्पिटलचे चेअरमन मछिंद्रनाथ पाटील, डॉ. अनंत पाटील, सरपंच पौर्णिमा कांबळे, अन्नपूर्णा नाईक, वर्षा पाटील, शशिकला पोडजाळे, रमेश पाटील, अलीखान पठाण, आदित्य पाटील, अमित देसाई, अमित निकम, तुषार पाटील, संतोष उर्फ बाली चव्हाण, CHO स्मिता चौगुले, संतोष उर्फ पिंटू पाटील, उत्तम कांबळे यांच्यासह गावातील मान्यवर व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.