साखर-तेलानंतर आता कांद्याच्या दरात मोठी वाढ; शेतकऱ्यांना खरंच फायदा होतोय का? जाणून घ्या प्रति किलो दर
मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांत साखर आणि तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच आता कांद्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. कांद्याच्या दरात झालेली वाढ ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानली जात आहे. मात्र, सध्या बहुतांश शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सध्या कांदा उपलब्ध आहे, त्या शेतकऱ्यांना या वाढलेल्या दराचा मोठा फायदा होताना दिसत आहे. दुसरीकडे, कांद्याच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. सध्या कांद्याचे किरकोळ दर 60 ते 70 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत.

देशात महागाई वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तेल आणि साखरेच्या किमती सातत्याने वाढत असतानाच आता कांद्याच्या दरातही वाढ झाली आहे. महाराष्ट्रात अलीकडच्या काळात कांद्याच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. सध्या राज्यात कांद्याचा किरकोळ भाव 60 ते 70 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
मात्र, कांद्याच्या वाढत्या दराचा मोठा फायदा सर्वच शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. याचं कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांकडे सध्या कांदा शिल्लक नाही. बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा व्यापाऱ्यांकडून आणला जात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे, त्यांनाच वाढलेल्या दराचा फायदा मिळताना दिसत आहे. मुंबईसह पुण्यातही कांद्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत कांद्याचा भाव 60 ते 70 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. तर पुण्यात कांद्याचे किरकोळ दर 60 ते 65 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहेत.
महाराष्ट्राची ओळख कांद्याचं प्रमुख उत्पादक राज्य म्हणून आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच कांद्याचे दर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले असतील, तर देशातील इतर राज्यांमध्येही कांद्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कांद्याच्या भावात अचानक वाढ होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे बाजारातील कांद्याचा कमी झालेला पुरवठा. नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर हे कांद्याचे प्रमुख उत्पादक भाग आहेत. या भागांमधून बाजारात होणारा पुरवठा कमी झाल्यामुळे कांद्याच्या दरात वाढ होत असल्याचं सांगितलं जात आहे.
नाशिकमधील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच एपीएमसी ही देशातील प्रमुख कांदा बाजारपेठ आहे. येथे चांगल्या प्रतीच्या कांद्याचा घाऊक भाव 55 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. तर कमी प्रतीचा कांदा सुमारे 45 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. याबाबत बोलताना लासलगाव एपीएमसीच्या एका सदस्याने सांगितलं की, गेल्या दोन वर्षांतील हा सर्वाधिक घाऊक भाव आहे. मध्य प्रदेश आणि कर्नाटकसारख्या शेजारील राज्यांमधून मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात येऊ लागला, तर कांद्याचे दर कमी होऊ शकतात. मात्र, पुरवठा वाढला नाही तर पुढील महिन्यात कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
घाऊक व्यापारी नितीन पारेख यांच्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या महिन्यात कांद्याच्या किरकोळ दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. चांगल्या प्रतीचा कांदा घाऊक बाजारात 52 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. तर कमी प्रतीचा कांदा 40 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. दरम्यान, पुण्यात कांद्याचे किरकोळ दर 60 ते 65 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तर घाऊक बाजारात कांदा सुमारे 50 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.




