सोने-चांदीच्या दरातील तेजीला ब्रेक! सोनं 3 हजारांनी स्वस्त, तर चांदीच्या दरातही मोठी घसरण

सोने-चांदीच्या दरातील तेजीला ब्रेक! सोनं 3 हजारांनी स्वस्त, तर चांदीच्या दरातही मोठी घसरण

मुंबई (प्रतिनिधी) : सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या 24 तासांत सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल तीन हजार रुपयांची घट होऊन दर 1 लाख 63 हजार रुपयांवरून 1 लाख 60 हजार रुपयांवर आले आहेत. तर चांदीच्या दरातही पाच हजार रुपयांची घसरण झाली असून, 2 लाख 50 हजार रुपयांवर असलेला दर 2 लाख 45 हजार रुपयांवर आला आहे. हे दोन्ही दर जीएसटीशिवाय आहेत.

यामुळे सोन्याच्या दरातील गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला अखेर ब्रेक लागला आहे. बुधवार, 27 ऑगस्ट रोजी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात 600 रुपयांची घसरण होऊन 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 66 हजार 500 रुपयांवर आला. आदल्या दिवशी हा दर 1 लाख 67 हजार 100 रुपयांवर बंद झाला होता.

दरम्यान, चांदीच्या दरात मात्र किंचित वाढ नोंदवण्यात आली. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार, मंगळवारी 2 लाख 50 हजार रुपये प्रति किलो असलेला चांदीचा भाव 500 रुपयांनी वाढून 2 लाख 50 हजार 500 रुपये प्रति किलो झाला.

सोन्याच्या दरात आजही घसरण पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याचा आधारभूत भाव प्रति ग्रॅम 16 हजार 200 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 14 हजार 850 रुपये आहे. बुधवारच्या तुलनेत यात अनुक्रमे 174 आणि 150 रुपयांची घट झाली आहे. आधारभूत भावामध्ये कर, शुल्क किंवा इतर अतिरिक्त आकारांचा समावेश नसतो.

अमेरिकेतील महागाईशी संबंधित PCE निर्देशांक जुलैमध्ये 3.7 टक्क्यांनी वाढल्याने सोन्याच्या दरावर दबाव आला आहे. हा दर अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या 2 टक्क्यांच्या उद्दिष्टापेक्षा जास्त आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या बैठकीत अमेरिकन फेडकडून व्याजदरासंदर्भात कठोर भूमिका घेतली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक कमी करून बॉण्ड्स आणि डॉलरकडे आपला कल वाढवल्याचं दिसत आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किमतीवरही झाला असून, तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचलेला स्पॉट गोल्डचा दर खाली आला आहे.