ठाकरेंच्या नगरसेवकांची पळवापळवी! भाजपमध्ये जाण्यासाठी निघाले, पण रातोरात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

ठाकरेंच्या नगरसेवकांची पळवापळवी! भाजपमध्ये जाण्यासाठी निघाले, पण रातोरात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई (प्रतिनिधी) : धाराशिव शहराच्या राजकारणात सध्या नगरसेवकांच्या पक्षांतरावरून मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे, भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेले नगरसेवक अचानक माघारी फिरले आणि थेट ठाण्यात पोहोचून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल झाले.

दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीम या नगरसेवकांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. मात्र, पुणे जिल्ह्यातील इंदापूरपर्यंत पोहोचल्यानंतर या नगरसेवकांनी अचानक यू-टर्न घेतला.

मुंबईऐवजी नगरसेवक पुन्हा धाराशिवला परतले. त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून त्यांना थेट ठाण्याला नेण्यात आलं. अखेर काल उशिरा रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे धाराशिवच्या राजकारणात या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू आहे.

धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेत उद्धव ठाकरे गटातील दहा नगरसेवक यापूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरातील नगरसेवकांनाही भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात होतं. या प्रयत्नाला ‘ऑपरेशन लोटस 2.0’ असं नाव दिलं जात असल्याची राजकीय चर्चा होती.

मात्र, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रयत्नाला ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ब्रेक लावल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेले नगरसेवक थेट शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याने ही राजकीय खेळी चर्चेचा विषय ठरली आहे.

या घडामोडीनंतर धाराशिवच्या राजकारणातील पुढचा अंक आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे गटाकडे आणखी दोन नगरसेवक असल्याचं सांगितलं जात आहे, तर भाजपच्या गोटात गेलेल्या एका नगरसेवकाचा प्रवेशही अद्याप चर्चेत आहे. त्यामुळे आगामी काळात हे नगरसेवक नेमके कोणत्या पक्षात जातात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, या नगरसेवकांच्या पक्षांतरामागे मोठ्या आर्थिक व्यवहाराची चर्चा शहरात सुरू असल्याचं बोललं जात आहे. कोट्यवधी रुपयांची बोली लावून नगरसेवकांची फूट घडवून आणली जात असल्याची कुजबुज असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या आर्थिक व्यवहाराबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.