सिलेंडरसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात, बुकिंगलाही अडचण; ई-केवायसी आताच करा, मुदत किती दिवसांनी वाढवली?
मुंबई (प्रतिनिधी) : सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरसाठी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवली आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांना कंपन्यांकडून संदेश पाठवले जात आहेत. ई-केवायसीची मुदत वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी आधार पडताळणीची अंतिम तारीख 16 ऑगस्ट होती, ती 23 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती.

मात्र, आता 31 ऑगस्टपर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते, बुकिंगवरही मर्यादा येऊ शकते आणि उज्ज्वला कनेक्शनअंतर्गत मिळणारं अनुदानही बंद होण्याची शक्यता आहे. हा नियम विद्यमान आणि नवीन अशा दोन्ही ग्राहकांना लागू असल्याचं सांगण्यात येत आहे.
नियमांनुसार, निर्धारित मुदतीपर्यंत पडताळणी पूर्ण न करणाऱ्या ग्राहकांना घरगुती किंवा अनुदानित दरात सिलेंडर मिळण्यात अडचण येऊ शकते. ई-केवायसी पूर्ण होईपर्यंत व्यावसायिक दराने सिलेंडर घ्यावा लागू शकतो, जो घरगुती दरापेक्षा अधिक असतो. मात्र, ग्राहकांचं कनेक्शन थेट रद्द केलं जाणार नाही. दीर्घकाळ ई-केवायसी न केल्यास कनेक्शन ब्लॉक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना तांत्रिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. तेल कंपन्यांची डिजिटल यंत्रणा मोठ्या प्रमाणातील ग्राहकांचा भार हाताळताना अडचणीत येत असल्याच्या तक्रारी आहेत. सर्व्हर बंद पडणे, अधिकृत ॲप्समध्ये तांत्रिक समस्या आणि प्रक्रिया धीमी होणे यामुळे ग्राहकांचं व्हेरिफिकेशन रखडत आहे.
डीलर्सच्या म्हणण्यानुसार, मुदतवाढ मिळाली असली तरी सिस्टममधील तांत्रिक समस्या अद्याप कायम आहेत. सर्व्हर बंद पडल्यास गॅस एजन्सीच्या कामकाजावर परिणाम होतो आणि ग्राहकांच्या रांगा वाढतात. त्यामुळे ग्राहकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचंही सांगण्यात येत आहे.
जर मोबाईल ॲपद्वारे ई-केवायसी पूर्ण करण्यात अडचण येत असेल, तर ग्राहकांकडे इतर पर्यायही आहेत.
गॅस एजन्सीमध्ये जाऊन: जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करता येईल.
सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीद्वारे: घरपोच सिलेंडर देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी व्यक्तीकडील अधिकृत डिव्हाइसच्या मदतीनेही बायोमेट्रिक प्रमाणीकरण करता येऊ शकतं.
त्यामुळे अंतिम मुदतीपूर्वी ई-केवायसी पूर्ण करून संभाव्य अडचणी टाळणं ग्राहकांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.




