शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिरांचे ठाकरे गटाला प्रत्युत्तर; वरळीतून लढणार का?

शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिरांचे ठाकरे गटाला प्रत्युत्तर; वरळीतून लढणार का?

मुंबई (प्रतिनिधी) : शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर माजी आमदार सचिन अहिर यांनी ठाकरे गटाकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. आपल्यासोबत असताना कौतुक केले जाते आणि पक्ष सोडल्यानंतर त्याच व्यक्तीला नालायक ठरवण्याचा प्रयत्न होतो, ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सचिन अहिर यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या. विधानसभा आणि मुंबई महापालिकेतील आपल्या कामाची साक्ष मतदारसंघातील नागरिक आणि कार्यकर्ते देतील, असा दावा त्यांनी केला. काहींना आपणच सर्वकाही आहोत असे वाटते, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला.

यावेळी पत्रकारांनी २०२९ मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर थेट उत्तर देणे टाळत, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्यावर जी जबाबदारी सोपवतील, ती मी पूर्ण ताकदीने पार पाडेन," असे त्यांनी सांगितले.अहिर यांनी पुढे सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्याला मोठी संधी दिली असून, आता राज्यभर शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ते काम करणार आहेत. राजकीय आरोपांना योग्य वेळी योग्य व्यासपीठावर उत्तर देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सचिन अहिर यांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. पक्षात महत्त्वाची पदे, जबाबदाऱ्या आणि सातत्याने संवाद असूनही काही नेते स्वार्थासाठी पक्ष सोडतात, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे सचिन अहिर यांच्यावर टीका केली होती. वरळी आणि शिवडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, कोणी आले किंवा गेले तरी पक्षावर त्याचा परिणाम होणार नाही, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला होता.