महाराष्ट्रातील सर्वात उंच ५१ फुटी गणेशमूर्ती ; लालबागच्या राजालाही मागे टाकलं
नागपूर - नागपुरातील दाभा परिसरात महाराष्ट्रातील सर्वात उंच, तब्बल ५१ फूट उंचीची गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजापेक्षाही उंच असलेली ही मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दोन महिन्यांच्या अथक मेहनतीनंतर तयार झालेल्या या मूर्तीची प्रतिष्ठापना आज होणार आहे.

अंतिम टप्प्यात तयारी, मंडळांमध्ये भव्यतेची शर्यत -
गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या शहरात, मंडळांमध्ये भव्य देखाव्यांची चुरस रंगली आहे. या भव्य मूर्तीच्या निर्मितीसाठी राजकुमार गुप्ता यांनी पुढाकार घेतला असून, ती चितारओळीतील प्रसिद्ध मूर्तीकार विजय वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली. विजय वानखेडे यांना १९ वर्षांचा अनुभव आहे. मूर्तीकार गोलू सूर्यवंशी, मुन्ना काशिकर, सुदेश पाटणकर आणि देवेंद्र शेंडे यांचा देखील यात मोलाचा सहभाग आहे.
ही पूर्णपणे मातीची मूर्ती असून, ती व्हाइट बंगला परिसरातील ग्रामीण पोलिस विभागाच्या मोकळ्या जागेवर उभारण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांसाठी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, लहान मुलांसाठी झुल्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
मूर्तीसाठी लागलेले साहित्य :
- ६०० किलो माती (आंधळगाव, भंडारा जिल्हा येथून आणलेली)
- ३०० पेंड्या तनस
- ३,००० फूट लाकडाचे बत्ते
- २० मीटर कापड, १५ मीटर दुपट्टा
- १०० पोती बारदाना
- १० मीटरचे आसन
- ८ फूट उंच मुकूट
- गणपतीसाठी हार, झुमके, बाजूबंद, कडे, स्टोन, लेस आदी सजावट
- २० लिटर रंग आणि पुटींगच्या १० बॅग
प्रवेशद्वारावरही आकर्षण -
मंडपाच्या प्रवेशद्वारावर ६ फूट उंचीचा आणखी एक गणपती विराजमान करण्यात येणार आहे. येणारे भक्त या गणपतीचेही दर्शन घेणार आहेत. यासोबतच १० दिवसांच्या उत्सवासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन उपक्रम, मोठा ४ फूट उंचीचा उंदीर अशा विविध आकर्षणांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
विसर्जनाचीही खास व्यवस्था -
इतकी मोठी मूर्ती असल्यामुळे विसर्जनाची चिंता होत होती. मात्र आयोजकांनी कल्पकतेने त्यावर उपाय शोधला आहे. मूर्तीच्या आत पाईप आणि शॉवर सिस्टम बसविण्यात आली आहे. ८ मोटरच्या साहाय्याने पाण्याचा फवारा मारून मूर्ती याच ठिकाणी विसर्जित केली जाणार आहे, असे आयोजक आनंद गुप्ता यांनी सांगितले.
ही भव्य मूर्ती पाहण्यासाठी नागपूरसह आसपासच्या भागातील गणेशभक्तांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या वर्षी नागपूरच्या या मंडळाने गणेशोत्सवात एक नवा उच्चांक गाठला आहे.




