नीट पेपरफुटीच्या चिखलफेकीनंतरही 'लातूर पॅटर्न'चाच डंका! दीड हजार विद्यार्थी घेणार शासकीय MBBS ला प्रवेश

नीट पेपरफुटीच्या चिखलफेकीनंतरही 'लातूर पॅटर्न'चाच डंका! दीड हजार विद्यार्थी घेणार शासकीय MBBS ला प्रवेश

लातूर : गेल्या काही महिन्यांपासून देशात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या वादळानंतर आणि पुनर्परीक्षेच्या तणावानंतर अखेर लातूरच्या गुणवंतांनी देशात पुन्हा एकदा आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. गुरुवारी घोषित झालेल्या नीटच्या अंतिम निकालानंतर लातूर पॅटर्नवर चिखलफेक करणाऱ्या टीकाकारांना विद्यार्थ्यांनी निकालातूनच चोख उत्तर दिले आहे. यंदाच्या निकालानंतर राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकट्या लातूरचे तब्बल १२०० ते १५०० हून अधिक विद्यार्थी एमबीबीएस (MBBS) साठी प्रवेश मिळवतील, असा खळबळजनक अंदाज शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

पेपरफुटीच्या मानसिक तणावावर मात

मे महिन्यात पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर देशभरातील विद्यार्थ्यांवर मोठा मानसिक ताण होता, तर काही दुर्दैवी आत्महत्यांच्या घटनाही घडल्या. या संपूर्ण गदारोळात लातूरच्या शिक्षण पद्धतीवरही संशयाचे ढग निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, लातूरच्या विद्यार्थ्यांनी डगमगून जाता पुनर्परीक्षेत आपल्या गुणवत्तेचे सोने केले आणि लातूर पॅटर्न हाच 'नंबर ' असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.

एकट्या शाहू कॉलेजमधून ४५० हून अधिक जण डॉक्टर होणार!

लातूरच्या नामांकित राजर्षी शाहू महाविद्यालयातून तब्बल ४५० हून अधिक विद्यार्थ्यांना शासकीय एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महाविद्यालयातील सुमारे १४०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी पहिल्या ६०० विद्यार्थ्यांच्या निकालाचे विश्लेषण केले असता, तब्बल ४६ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ६०० हून अधिक गुणांचा टप्पा पार केला आहे. तसेच ५३० पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०० हून अधिक आहे. उर्वरित ८०० विद्यार्थ्यांच्या निकालाचे विश्लेषण पूर्ण झाल्यावर हा आकडा आणखी वाढेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

सर्वच प्रमुख शिक्षण संस्थांची बाजी

यंदाच्या नीट परीक्षेत लातूरमधील एकाच संस्थेने नाही, तर सर्वच नामांकित शिक्षण संस्थांनी यशाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये:

·         राजर्षी शाहू महाविद्यालय

·         दयानंद विज्ञान महाविद्यालय

·         रिलायन्स लातूर पॅटर्न

·         बसवेश्वर महाविद्यालय

·         संत तुकाराम महाविद्यालय

या सर्व संस्थांमधील विद्यार्थ्यांनी यंदा नीटमध्ये उल्लेखनीय गुण मिळवले आहेत. शासकीय महाविद्यालयांशिवाय खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या लातूरच्या विद्यार्थ्यांची संख्या तर यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असणार आहे, ज्यामुळे यंदाही वैद्यकीय प्रवेशांवर 'लातूर पॅटर्न'चेच पूर्ण वर्चस्व पाहायला मिळणार आहे.