कोल्हापूरकरांनो लक्ष द्या! 'नशामुक्त कोल्हापूर'साठी प्रशासनाचे मोठे पाऊल; तुमच्या एका फोनवर होणार कडक कारवाई
कोल्हापूर /प्रतिनिधी : जिल्ह्यात 'नशामुक्त कोल्हापूर' अभियानांतर्गत प्रत्येक स्तरावर जनजागृतीसह कडक कायदेशीर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी येत्या १५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये नशामुक्तीचे अधिकृत ठराव मंजूर करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

या अभियानाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह पोलीस, परिवहन, आरोग्य, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक गाव आणि वॉर्ड होणार नशामुक्त
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी अभियानाच्या नियोजनाचा आढावा घेत प्रत्येक गाव आणि शहरांमधील प्रत्येक प्रभाग (वॉर्ड) नशामुक्त करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी तातडीने ठराव मंजूर करण्याच्या सूचना दिल्या. हे सर्व ठराव येत्या १५ ऑगस्टपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. याशिवाय शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि आयटीआय परिसरातील १०० मीटरच्या हद्दीचे सीमांकन करून तेथील पानटपऱ्या तातडीने हटविण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच, शाळांमध्ये दर शनिवारी विद्यार्थ्यांसाठी नशामुक्तीविषयक विशेष सत्रांचे आयोजन करण्यात यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
८४ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या धडक कारवाईची आकडेवारी सादर केली. १५ जुलैअखेर जिल्ह्यात एकूण १२४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ८२ गांजा सेवन करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत २१३ किलो गांजा, ४० किलो अफूची झाडे आणि ९५ ग्रॅम एमडी ड्रग्ज असा एकूण ८४ लाख १२ हजार १०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शाळा-महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरातील पानटपऱ्या कायमस्वरूपी बंद करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कडक पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले.
गोपनीय माहितीसाठी हेल्पलाईन; सोशल मीडियावर मोहीम
अंमली पदार्थांचे सेवन, विक्री अथवा बेकायदेशीर साठवणुकीबाबत नागरिकांना थेट पोलिसांना माहिती देता यावी, यासाठी प्रशासनाने ९८२२७६६१०० हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे.
तसेच या अभियानाची व्याप्ती वाढवण्यासाठी सोशल मीडियाचाही प्रभावी वापर केला जात असून, नागरिकांनी आपल्या परिसरातील नशामुक्ती उपक्रमांची माहिती, फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना #नशामुक्तकोल्हापूर या अधिकृत हॅशटॅगचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.




