भाजप प्रवेशानंतर मुख्यमंत्री फडणवीस व समरजितसिंह घाटगे यांच्यात रंगल्या राजकीय चर्चा

भाजप प्रवेशानंतर मुख्यमंत्री फडणवीस व समरजितसिंह घाटगे यांच्यात रंगल्या राजकीय चर्चा

मुंबई (प्रतिनिधी): राजकारणात अनेक भेटीगाठी होतात, पण काही क्षण असे असतात जे नात्याची खोली दाखवून जातात. शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस  यांची ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानी घेतलेली सदिच्छा भेट याच प्रकारातील ठरली.

भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी घाटगे यांचे मनापासून अभिनंदन करत “राजे, भाजपमध्ये तुमचे स्वागत आहे” असे म्हणत दिलेली स्नेहपूर्ण मिठी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.राजकिय औपचारिककतेपलिकडील या जिव्हाळ्याच्या मिठीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि राजे समरजीतसिंह घाटगे  यांचा उंचावलेला अंगठा विश्वास, आत्मीयता आणि नव्या राजकीय प्रवासाची दमदार सुरुवात दर्शवणारा आहे.ही मिठी केवळ औपचारिक नव्हती, तर परस्पर आदर व्यक्त करणारी होती. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घाटगे पोहोचताच त्यांचे अत्यंत उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. 

     यावेळी दोघांमध्ये सुमारे अर्धा तास विविध राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राची भूमिका, कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रगतीच्या संधी आणि आगामी राजकीय वाटचाल यावर सकारात्मक विचारमंथन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.यापूर्वी बुधवारी सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रदेश कार्यालयात घाटगे यांनी भाजपमध्ये शानदार सोहळ्यात प्रवेश केला होता. त्या वेळीही त्यांचे जोरदार स्वागत झाले होते.

     या सर्व घडामोडींमुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि राजे समरजितसिंह घाटगे यांच्यातील संबंध केवळ राजकीय मर्यादेत न राहता, अधिक जवळचे व विश्वासपूर्ण असल्याचे स्पष्ट होत आहे. भेटीवेळी राजे वीरेंद्रसिंह घाटगे, स्वप्निल भोसले आणि दीपक कदम हेही उपस्थित होते.