अशोकराव माने फार्मसी ग्रुपमध्ये पूल कॅम्पस ड्राइव्ह २०२६ उत्साहात संपन्न; १०० हून अधिक विद्यार्थ्यांची अंतिम निवड
पेठ वडगाव (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना दर्जेदार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अशोकराव माने फार्मसी ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेला ‘पूल कॅम्पस ड्राइव्ह २०२६’ मोठ्या उत्साहात आणि यशस्वी वातावरणात संपन्न झाला. अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी, पेठ वडगाव येथे भारतातील आघाडीची औषध निर्मिती कंपनी इनक्यूब इथिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, गोवा यांच्या वतीने या भव्य मेगा प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.

आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी जोडणाऱ्या संधींचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून आणि त्यांचे करिअर घडविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पस ड्राइव्हने विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील विविध फार्मसी महाविद्यालयांमधील सुमारे ३०० पेक्षा अधिक D.Pharm, B.Pharm आणि M.Pharm शाखेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि प्रतिसाद पाहता कार्यक्रमाला मेगा रोजगार मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले.
कंपनीतर्फे एच.आर. विभागाचे विश्वास नाईक आणि प्रशांती सौरभ यांच्यासह आशुतोष मोहंती, प्रदीप देशमुख, सूर्यकांत महालकर, भोजराज भोसले, प्रांजली सातार्डेकर, अश्विनी बांदेकर आणि भैरवी गुरव यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. उमेदवारांची निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर आणि व्यावसायिक पद्धतीने तीन टप्प्यांत पार पडली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाची चाचणी, संवाद कौशल्य, आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास तसेच क्षेत्रीय कामाबाबतची तयारी यावर विशेष भर देण्यात आला.
प्रत्येक टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या ज्ञान व कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. अंतिम फेरीमध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यश संपादन करत विविध पदांसाठी निवड मिळवली. या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा ठसा पुन्हा एकदा उमटला आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अशोकराव माने ग्रुपचे अध्यक्ष मा.विजयसिंह माने यांनी अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगाराभिमुख कौशल्ये प्राप्त होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संस्थेच्या संचालिका मा.मनिषा माने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी विविध उद्योगाभिमुख उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सदर पूल कॅम्पस ड्राइव्हचे समन्वयन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे डॉ. प्रशांत कुंभार, प्रा. स्नेहल साळोखे आणि प्रा. शुभम मगर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. ए. पी. गडद, प्राचार्य डॉ. डी. आर. जडगे, प्राचार्य डॉ. एन. बी. चौगुले, प्राचार्य डॉ. ए. एस. कुलकर्णी आणि प्राचार्या पी. जे. पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
यावेळी शैक्षणिक समन्वयक डॉ. एस. ए. बंडगर, प्रा. विनोद पट्टणकुडे, प्रा. ऋषिकेश काटकर, प्रा. आझाद ढगे, प्रा. अमर देसाई, प्रशांत पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाशी जोडणारा आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारा हा पूल कॅम्पस ड्राइव्ह अशोकराव माने फार्मसी ग्रुपसाठी अभिमानास्पद आणि संस्मरणीय ठरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आयोजकांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.




