निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्राने खळबळ; तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या पदांवर प्रश्नचिन्ह

निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्राने खळबळ; तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या पदांवर प्रश्नचिन्ह

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पक्षात खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या नावासमोर अनुक्रमे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष हे पद नमूद केलं नाही. त्यामुळे ही दोन्ही नेते पक्षांच्या त्या त्या पदांवर आहेत की नाही असा प्रश्न आता पुन्हा उपस्थित होत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला 29 एप्रिल रोजी एक पत्र देण्यात आलं आहे. या पत्रात अरुणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष टोको तातूंग यांचा नावासमोर प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख केला आहे. पण त्याच यादीत सुनिल तटकरे यांच्या नावासमोरच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असं नमूद केलं नाही. सुनील तटकरे यांच्या नावासमोर केवळ लोकसभेचे गटनेते म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. 

त्याचवेळी खासदार प्रफुल पटेल हेदेखील राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत की नाही असाही प्रश्न विचारला जात आहे. कारण निवडणूक आयोगाला दिलेल्या त्या पत्रात प्रफुल पटेल यांच्या नावासमोर तसं नमूद करण्यात आलं नाही. प्रफुल पटेल यांच्या नावासमोर केवळ राज्यसभेचे गटनेते असा उल्लेख आहे.

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडून पाच दिवसांपूर्वी ट्विट करत या पत्रात बदल केला जाईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र अद्याप यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांकडूनही त्या पत्रात बदल केल्याची किंवा चूक सुधारल्याची अद्याप तरी माहिती नाही. त्यामुळे 29 एप्रिलच्या पत्रानुसार, खासदार सुनिल तटकरे प्रदेशाध्यक्ष नाही आणि प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे कार्याध्यक्ष नसल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणीतून दुसऱ्यांदा वगळण्यात आलं आहे. ही यादी व्हायरल झाल्यावर सुनेत्रा पवारांनी स्पष्टीकरण दिलं. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत तांत्रिक आणि क्लेरिकल चूक असून ती लवकरच दुरूस्ती केली जाईल असं सुनेत्रा पवारांनी म्हटलं. पत्रात जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ आणि जय पवारांच्या नावांचा उल्लेख आहे. मात्र तटकरे आणि पटेल यांना जाणीवपूर्वक डावललं जातंय का, आणि यामागे पार्थ पवारांचं या दोन नेत्यांसोबत सुरु असलेलं शीतयुद्ध कारण आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.