परप्रांतियांना मारहाण करणं म्हणजे मुंबईचा विकास नव्हे ; मुख्यमंत्र्यांनी साधला ठाकरे बंधूवर निशाणा
मुंबई - मराठी माणसाचा खरा विकास नेमका काय, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. गेल्या 25 वर्षांत मराठी माणसाला रोजगारासाठी मुंबईबाहेर जावं लागलं, हा विकास ठरू शकत नाही. तसेच परप्रांतियांना मारहाण करणं म्हणजे विकास नव्हे, असा टोलाही त्यांनी लगावला. ठाकरे बंधूंनी मराठी - अमराठी असा भेद निर्माण करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला, मात्र मराठी माणूस संकुचित नसल्याचं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राची क्षेत्रीय अस्मिता आणि मराठी भाषेचा अभिमान आहे, पण सर्वांगीण कल्याण आणि महाराष्ट्रात मराठी माणसाची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री वरळीतील बीडीडी चाळीतील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी गेले असता स्थानिकांनी त्यांचे आभार मानले. बीडीडी प्रकल्पावरून श्रेयवादाची लढाई सुरू असताना त्यांनी प्रत्यक्ष भेट देत नागरिकांशी संवाद साधला. राज्यातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असल्याचा विश्वास व्यक्त करत 26 ते 27 महानगरपालिकांमध्ये भाजप - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे महापौर असतील, असा दावा त्यांनी केला. आम्ही केवळ हिंदुत्व नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली. हिंदुत्व आणि विकास वेगळे होऊ शकत नाहीत. आमचं हिंदुत्व पूजा पद्धतीपुरतं मर्यादित नाही. भारतीय संस्कृती आणि प्राचीन जीवनपद्धती मानणाऱ्यांना आम्ही हिंदू मानतो आणि त्यांना सोबत घेऊन चालतो, असं फडणवीस यांनी सांगितलं. मराठी आणि हिंदू हे वेगळे करता येत नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं.
महापालिका निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, तर मुंबई, पुणे आणि पिंपरी - चिंचवड महापालिकाही महायुती जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ठाकरे बंधूंच्या युतीवर पुन्हा निशाणा साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ही युती प्रीतीसंगम नसून भीतीसंगम आहे. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आल्याचाही आरोप त्यांनी केला.




