राष्ट्रीय शेतकरी दिन - शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या 'या' महत्त्वाच्या योजनांची जाणून घ्या सविस्तर माहिती...

राष्ट्रीय शेतकरी दिन - शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या 'या' महत्त्वाच्या योजनांची जाणून घ्या सविस्तर माहिती...

राष्ट्रीय शेतकरी दिन विशेष - किसान दिवस अर्थात राष्ट्रीय शेतकरी दिन दरवर्षी २३ डिसेंबर रोजी देशभरात साजरा केला जातो. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस पाळला जातो. चौधरी चरण सिंह यांनी संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी समर्पित केले असून जमीन सुधारणा राबवण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरली. त्यांच्या कार्याची दखल घेत २००१ साली केंद्र सरकारने २३ डिसेंबर हा दिवस अधिकृतपणे राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून घोषित केला.

राष्ट्रीय शेतकरी दिन २०२५ ची थीम ‘विकसित भारत २०४७ : भारतीय शेतीच्या जागतिकीकरणात एफपीओची भूमिका’ अशी आहे. यावर्षीच्या चर्चांमध्ये शेतकरी उत्पादक संघटना (FPO) आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय शेतीला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कसे बनवता येईल, यावर भर देण्यात आला.

शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी मोदी सरकारने राबवलेल्या प्रमुख योजना पुढीलप्रमाणे - 

१. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) - या योजनेअंतर्गत सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम चार महिन्यांच्या अंतराने २,००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा होते.

२. प्रधानमंत्री फसल विमा योजना - नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देणारी ही योजना आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कमी प्रीमियम भरावा लागतो. 

खरीप पिके: २%, रब्बी पिके: १.५%, बागायती पिके: ५%.

३. किसान क्रेडिट कार्ड योजना - या योजनेमुळे शेतकऱ्यांना कमी व्याजदरात आणि वेळेवर कर्ज उपलब्ध होते. वेळेवर परतफेड केल्यास ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज केवळ ४ टक्के व्याजदराने मिळू शकते.

४. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - “प्रति थेंब अधिक पीक” हे या योजनेचे घोषवाक्य असून पाण्याचा कार्यक्षम वापर वाढवणे हा मुख्य उद्देश आहे. ठिबक व तुषार सिंचनसारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींना अनुदान दिले जाते.

५. प्रधानमंत्री कुसुम योजना - शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे सिंचन पंप बसवण्यासाठी ही योजना मदत करते. यामध्ये ३० ते ५० टक्के अनुदान मिळते, तसेच अतिरिक्त वीज वीज वितरण कंपन्यांना विकण्याची संधीही उपलब्ध होते.

६. प्रधानमंत्री किसान मान-धन योजना - अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असलेली ही ऐच्छिक पेन्शन योजना आहे. १८ ते ४० वयोगटातील शेतकरी सहभागी होऊ शकतात. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३,००० रुपयांची पेन्शन मिळते.