अक्षय खन्नावर 'या' दिग्दर्शकाने केली उघडपणे नाराजी व्यक्त
मुंबई - बॉलीवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या ‘धुरंधर’ च्या यशाचा आनंद घेत असतानाच तो एका मोठ्या वादात अडकलेला दिसत आहे. ‘दृश्यम ३’ चे निर्माता कुमार मंगत यांनी अक्षय खन्नावर शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधी अचानक चित्रपटातून बाहेर पडल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, चित्रपट सोडण्यापूर्वी अक्षयने अॅडव्हान्स रक्कम घेतल्याचाही दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात आता ‘सेक्शन ३७५’ चे लेखक - दिग्दर्शक मनीष गुप्ता यांनीही उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मनीष गुप्ता म्हणाले की, २०१७ मध्ये अक्षय खन्नाने ‘सेक्शन ३७५’ चित्रपट साइन केला होता. या चित्रपटात मनीष दिग्दर्शक - लेखक होते, तर कुमार मंगत निर्माता होते. अक्षयचे मानधन २ कोटी रुपये ठरले होते आणि त्याने २१ लाख रुपये अॅडव्हान्स घेत करारही केला होता. मात्र, शूटिंग सुरू होण्याआधीच अक्षयने ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ साठी आपल्या नियोजित तारखा दिल्या आणि त्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला रवाना झाला. यामुळे मनीष गुप्ता आणि त्यांच्या टीमचे जवळपास सहा महिने काम ठप्प झाले, असा आरोप त्यांनी केला.
मनीष गुप्ता पुढे म्हणाले की, शूटिंग पूर्ण झाल्यानंतर अक्षय परत आल्यानंतर त्याने ठरलेल्या २ कोटी रुपयांऐवजी ३.२५ कोटी रुपयांची मागणी केली, जी कराराचे सरळ उल्लंघन होती. एवढेच नाही, तर अक्षयला चित्रपटावर पूर्ण नियंत्रण हवे होते आणि सर्व निर्णय स्वतःच्या मर्जीनुसार घ्यायचे होते. मी अशा प्रकारचा दिग्दर्शक नाही जो अभिनेत्याच्या अवास्तव मागण्यांना मान देईल, असे मनीष गुप्ता यांनी स्पष्ट केले.
मनीष गुप्ता यांनी आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, त्यांच्या कडक दिग्दर्शन पद्धतीमुळे अक्षयच्या अहंकाराला धक्का बसला आणि त्याने निर्माता कुमार मंगतवर दबाव टाकून मनीष यांना दिग्दर्शकपदावरून हटवण्याचा प्रयत्न केला. अखेर, अभिनेत्याच्या वर्तनाला आळा घालण्याऐवजी, निर्मात्याने मनीष यांनाच बळीचा बकरा बनवले. त्यांना दिग्दर्शकपदावरून हटवण्यात आले आणि त्यांनी तीन वर्षे मेहनतीने तयार केलेली संपूर्ण पटकथा व हार्ड ड्राइव्हही जप्त करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.
या प्रकरणात कायदेशीर कारवाईचीही चर्चा झाली होती. मनीष गुप्ता यांनी सांगितले की, त्यांनी अक्षय खन्नाला न्यायालयात नेण्याचा इशारा दिला होता आणि निर्माता कुमार मंगत यांना दोन कायदेशीर नोटिसा पाठवल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल होणार होता, मात्र कुमार मंगत यांनी न्यायालयाबाहेर तडजोड केली.
दरम्यान, आज ‘दृश्यम ३’ च्या निमित्ताने पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला असून, मनीष गुप्ता यांच्या मते, अक्षय खन्नाच्या कथित अनैतिक वर्तनाचे परिणाम आता निर्माता कुमार मंगत भोगत आहेत आणि त्यांनीच आता अक्षयविरुद्ध कायदेशीर पावले उचलली आहेत.




