‘आशा’ चित्रपटाला महाराष्ट्रभर उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आशा’ चित्रपटाला महाराष्ट्रभर उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई - महिलांचा संघर्ष, जिद्द आणि सामाजिक आरोग्य व्यवस्थेतील त्यांच्या अमूल्य योगदानाची प्रभावी मांडणी करणारा ‘आशा’ हा चित्रपट सध्या सर्वत्र प्रदर्शित होत असून, महाराष्ट्रभरातून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे गावोगावी आशा सेविका स्वतः पुढाकार घेऊन गटाने चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहत आहेत. चित्रपट पाहताना अनेक आशा सेविका भावूक होत असून, आपलीच कथा पडद्यावर पाहिल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. यातील अनेक आशा ताई पहिल्यांदाच चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहत असल्याने हा अनुभव त्यांच्यासाठी अत्यंत खास आणि प्रेरणादायी ठरत आहे. प्रेक्षकांकडूनही या चित्रपटाचे कौतुक होत आहे.

दरम्यान, समाजातील विविध घटकांकडून या चित्रपटाला मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. काही सामाजिक कार्यकर्ते स्वखुशीने पुढाकार घेऊन आशा सेविकांसाठी विशेष शो आयोजित करत आहेत. तसेच काही सामाजिक संस्था, प्रशासन आणि राजकीय नेते जास्तीत जास्त आशा सेविका व अंगणवाडी सेविकांनी हा चित्रपट पाहावा यासाठी प्रयत्नशील आहेत. आरोग्य राज्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणीत आशा सेविकांसोबत चित्रपट पाहिला, तर आमदार मंजुळा गावित यांनीही हा चित्रपट पाहून त्याचे कौतुक केले. नारायणगाव येथे डिसेंट फाऊंडेशनच्या वतीने सलग चार दिवस आशा सेविकांसाठी विशेष शो आयोजित करण्यात आले असून, लेडिज क्लब धाराशिवच्या वतीनेही या चित्रपटाचे मोफत शो घेण्यात आले आहेत.

दिपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’ या चित्रपटात रिंकू राजगुरू, सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रिंकू राजगुरूच्या अभिनयाने प्रेक्षकांची विशेष मने जिंकली असून, तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा सेविकांचा सन्मान करणारा ‘आशा’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता एक सामाजिक चळवळ ठरत असल्याचे चित्र महाराष्ट्रभर दिसून येत आहे. जरी बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळाले नसले, तरी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यात हा चित्रपट नक्कीच यशस्वी ठरला आहे.