रेमो डिसूझाकडून ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गँगस्टर रवी पुजारी अटकेत

रेमो डिसूझाकडून ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गँगस्टर रवी पुजारी अटकेत

मुंबई - मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक व चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांच्याकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गँगस्टर रवी पुजारीने ही खंडणी मागितल्याचा आरोप असून, त्याने रेमो डिसूझा आणि त्यांची पत्नी लिझेल डिसूझा यांना वारंवार फोन करून धमकावल्याचे तपासात समोर आले आहे. हे प्रकरण उघड होताच मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई केली. संशयित रवी पुजारीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुजारीने २०१८ साली रेमो डिसूझाकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याच प्रकरणात त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी सेनेगलमधून हद्दपार झाल्यानंतर रवी पुजारी तुरुंगात होता. मात्र, रेमो डिसूझाकडून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात त्याला यापूर्वी शिक्षा सुनावण्यात आलेली नव्हती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २२ जानेवारी रोजी पुजारीला न्यायालयात हजर केले असून, तो सध्या अटकेत आहे.

या प्रकरणातील आणखी एक संशयित सत्येंद्र त्यागीच्या सांगण्यावरून पुजारीने रेमो डिसूझा आणि त्यांच्या पत्नीला धमकी दिली होती. ऑक्टोबर २०१६ ते ऑक्टोबर २०१८ या कालावधीत रवी पुजारीने दोघांनाही धमकावल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा डाव रचण्यात आला होता. आरोपीने रेमो डिसूझाच्या मॅनेजरलाही फोन करून धमकी दिल्याचे समोर आले आहे.

‘डेथ ऑफ अमर’ हा चित्रपट लवकर प्रदर्शित करण्यासाठी पुजारीने दबाव आणला होता. हे प्रकरण मिटवण्यासाठी त्याने ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. २०१८ मध्ये रेमो डिसूझा आणि सत्येंद्र त्यागी यांच्यात ‘अमर जस्ट डाय’ या चित्रपटासाठी करार झाला होता. मात्र, चित्रपटाच्या हक्कांवरून आणि निधीवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. सत्येंद्र त्यागीने या चित्रपटात गुंतवणूक केल्याचा दावा करत रेमो डिसूझावर ५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. यानंतर रवी पुजारीने रेमो डिसूझाच्या मॅनेजरला धमकावण्यास सुरुवात करत ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. याच वादातून धमकीचे सत्र सुरू झाल्याचा रेमो डिसूझाचा आरोप आहे.