अभिजीत सावंत 'या' कारणांमुळे राहिला चर्चेत
मुंबई - सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत होत असताना, 2025 हे वर्ष अनेक कलाकारांसाठी खास ठरलं. नवनवीन प्रोजेक्ट्स, अनपेक्षित कोलॅबोरेशन्स आणि वेगळ्या प्रयोगांनी मनोरंजन विश्व गाजवलं. मात्र संगीत क्षेत्रात जे नाव सातत्याने चर्चेत राहिलं, ते म्हणजे गायक अभिजीत सावंत. सदाबहार गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिजीतने 2025 मध्ये पुन्हा एकदा आपली जादू सिद्ध केली. विशेष म्हणजे, जेन झी पिढीसाठी त्याने OG गाण्यांची नवी, ट्रेंडी आवृत्ती सादर करत एक अनोखं गिफ्ट दिलं.

संगीत क्षेत्रात 20 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करत असताना 2025 हे वर्ष अभिजीतसाठी नावीन्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स घेऊन आलं. त्याच्या मधुर आवाजासोबतच गाण्यांमधील अभिनयाचाही प्रेक्षकांनी मनसोक्त अनुभव घेतला. इंडियन आयडॉलपासून सुरू झालेला त्याचा प्रवास अनेक रिअॅलिटी शोजमधून पुढे जात राहिला आणि याच वर्षात ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’मध्ये सहभाग घेत त्याने नामवंत शेफ्ससोबतही प्रेक्षकांची मनं जिंकली. गाणं आणि खाणं या दोन्ही गोष्टींचा सुंदर समतोल साधत त्याने 2025 मध्ये अनेक हिट गाणी दिली.
बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या संगीत महोत्सवांपैकी एक असलेल्या ‘बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्ट’ मध्ये अभिजीतने मराठी गाणं सादर करत हिंदी रसिक प्रेक्षकांनाही भुरळ घातली. अजय - अतुलनंतर या प्रतिष्ठित मंचावर गाण्याचा मान मिळवणारा तो मराठी गायक ठरला. जुन्या आयकॉनिक गाण्यांना मॉडर्न टच देत ‘आय पॉपस्टार’ सारख्या मंचावर किंगसोबत ‘मोहब्बते लुटाऊंगा’ हे गाणं नव्या ढंगात सादर करत त्याने जेन झीला अक्षरशः वेड लावलं. हे नवं व्हर्जन केवळ जेन झीच नव्हे तर मिलेनियल्समध्येही तितकंच लोकप्रिय ठरलं.
‘तुझी चाल तुरु तुरु’, ‘ढगाला लागली कळ’, ‘रुपेरी वाळूत’ यांसारख्या सदाबहार गाण्यांना हटके ट्विस्ट देत अभिजीतच्या आवाजाने ही गाणी पुन्हा एकदा रसिकांच्या मनावर राज्य करू लागली. 2025 मध्ये आयकॉनिक गाण्यांच्या रिक्रिएशनमधून त्याने जुन्या आठवणींना नवी झळाळी दिली आणि आजची पिढी या गाण्यांवर ट्रेंड करू लागली.
वर्षाच्या शेवटी आणखी एका अनपेक्षित कोलॅबोरेशनसह अभिजीत पुन्हा चर्चेत आला. नृत्यांगना गौतमी पाटीलसोबत ‘रुपेरी वाळूत’ हे धमाकेदार गाणं सादर करत त्याने प्रेक्षकांची दाद मिळवली. ट्रेंडी संगीत, प्रभावी अभिनय आणि नावीन्यपूर्ण प्रयोग यामुळे 2025 हे वर्ष अभिजीत सावंतसाठी खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरलं. आता नव्या वर्षात अभिजीत मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीतही नवनवीन गाण्यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच लागून राहिली आहे.




