'बिग बॉस मराठी ६’ मध्ये तुफान राडा ; तन्वी - दीपाली आमनेसामने

'बिग बॉस मराठी ६’ मध्ये तुफान राडा ; तन्वी - दीपाली आमनेसामने

मुंबई - कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ च्या सहाव्या पर्वाला सुरुवात होताच घरात रोज नवनवीन वाद रंगताना दिसत आहेत. मैत्री, मतभेद, टास्क जिंकण्याची चढाओढ आणि डावपेच यामुळे प्रेक्षकांना रोज मनोरंजनाचा तडका मिळत आहे. सध्या स्पर्धक तन्वी कोलते घरातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या नव्या प्रोमोमध्ये घरात दोन मोठे राडे पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रोमोमध्ये तन्वी कोलते आणि दीपाली सय्यद यांच्यात जोरदार शाब्दिक वाद रंगलेला दिसतो. तर दुसऱ्या बाजूला सागर कांरडे आणि तन्वी यांच्यातही खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळते.

घरातील कामाच्या वाटणीवरून आणि ड्युटीवरून तन्वी आणि दीपाली यांच्यात तीव्र वाद झाले. कामाच्या मुद्द्यावरून दोघींमध्ये जोरदार खटके उडाले. या वादामुळे घरातील इतर सदस्यही काही काळ अवाक झाले. दोघींमधील शाब्दिक चकमक चांगलीच रंगताना दिसणार आहे. वादादरम्यान दीपाली सय्यद म्हणाली, मी जिथे चांगली असते तिथे चांगलीच असते. तुमचं मत ठामपणे मांडा आणि त्यावर उभे राहा. यावर तन्वी कोलते म्हणाली, नाही नाही! हे कॅमेऱ्याला दिसेल... तू जे बोललीस ते सांग. मला वाटलं नव्हतं एवढा तमाशा होईल. एवढ्याशा गोष्टीवर सॉरी! 

https://www.instagram.com/reel/DThvIbaDa3t/?utm_source=ig_web_copy_link&igsh=NTc4MTIwNjQ2YQ==

मकर संक्रांतीचा उल्लेख करत तन्वी म्हणाली, आज सण आहे म्हणून मी सगळ्यांशी गोड बोलले. मला काय माहीत होतं हे असं वाकड्यात जाईल. यावर दीपालीने प्रत्युत्तर देताना म्हटले, तुम्हाला काहीतरी प्रूफ करायचंय. मला काही सिद्ध करायचं नाही. मी मोठ्यांना मान देते. आदर घ्यायला शिक. त्यावर संतप्त झालेली तन्वी म्हणाली, असं करून जर मी वाईट ठरणार असेल, तर मी वाईटच बरी आहे. 

दरम्यान, ‘बिग बॉस’ च्या घरात आता नवे ग्रुप्स आणि नवी समीकरणं तयार होताना दिसत आहेत. पुढील दिवसांत कोण कोणाच्या टीममध्ये जाणार, कोणती जोडी फुटणार आणि कोणती नवी मैत्री तयार होणार, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.