२९ वर्षांनंतर रेणुका शहाणेंना फिल्मफेअर पुरस्कार

२९ वर्षांनंतर रेणुका शहाणेंना फिल्मफेअर पुरस्कार

मुंबई - मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ आणि बहुगुणी अभिनेत्री रेणुका शहाणे यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे तब्बल २९ वर्षांनंतर त्यांना हा मान मिळाल्याने हा क्षण केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर त्यांच्या चाहत्यांसाठीही भावनिक ठरला आहे. ‘अबोली’ या गाजलेल्या भूमिकेपासून ते ओटीटीवरील प्रभावी अभिनयापर्यंतचा त्यांचा प्रदीर्घ प्रवास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

रेणुका शहाणे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात दूरदर्शन आणि मराठी चित्रपटांमधून केली. ‘अबोली’ या मालिकेमधील त्यांच्या भूमिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या. त्यानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारत स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘हम आपके हैं कौन’ या सुपरहिट चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही आपला ठसा उमटवला, तर दूरदर्शनवरील ‘सुरभि’ कार्यक्रमामुळे त्या देशभर लोकप्रिय झाल्या.

१९९५ मध्ये ‘अबोली’ साठी रेणुका शहाणेंना पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. आता २९ वर्षांनंतर, ‘धावपट्टी’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि ‘दुपहिया’ या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री असे दोन मानाचे फिल्मफेअर पुरस्कार त्यांच्या नावावर जमा झाले आहेत.

https://www.instagram.com/p/DSSUghDCMhz/?utm_source=ig_web_copy_link

काळ बदलला, माध्यमे बदलली, मात्र रेणुका शहाणेंचा अभिनयातील सातत्य, प्रगल्भता आणि सौंदर्य आजही तितकेच कायम आहे. अलीकडच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या असून, कोणतीही व्यक्तिरेखा ताकदीने साकारण्याची त्यांची क्षमता आजही तितकीच प्रभावी असल्याचे त्यांनी पुन्हा सिद्ध केले आहे.