'या' चित्रपटाच्या टीझरला उत्स्फूर्त प्रतिसाद ; द फोल्क आख्यानकडे संगीताची धुरा

'या' चित्रपटाच्या टीझरला उत्स्फूर्त प्रतिसाद ; द फोल्क आख्यानकडे संगीताची धुरा

मुंबई - शाळेच्या गोड आठवणींना पुन्हा उजाळा देणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या उत्साहात आणखी भर घालत दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या संगीत टीमची घोषणा केली आणि त्यानंतर चित्रपटाविषयीची चर्चा अधिक रंगू लागली आहे. महाराष्ट्रभर गाजत असलेल्या, लोककलेला आधुनिक मंच मिळवून देणाऱ्या ‘द फोल्क आख्यान’ या प्रभावी टीमकडे चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या दमदार शैली, ठसकेदार सादरीकरण आणि लोककलेला आधुनिक पद्धतीने मांडण्याच्या कौशल्यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप पाडली आहे. 

खास बाब म्हणजे ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट असून त्यांनी यासाठी पाच खणखणीत, ऊर्जा भरून वाहणारी आणि रंगतदार गाणी तयार केली आहेत. हर्ष - विजय यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना गीतकार ईश्वर ताराबाई अंधारे यांची शब्दरचना लाभली आहे. त्यामुळे ‘द फोल्क आख्यान’ची संगीतशैली आणि हेमंत ढोमे यांच्या कथनशैलीचा संगम पडद्यावर कसा दिसणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, ‘द फोल्क आख्यान’ ची निवड यासाठीच केली की त्यांची ऊर्जा, लोककलेविषयीची समज आणि जमिनीशी असलेलं नातं आमच्या चित्रपटाच्या विषयाला अगदी साजेसं आहे. या पाच गाण्यांतून मराठी मातीतली ममता प्रकट होईल. त्यांच्या सादरीकरणातील ताकद, लय आणि प्रामाणिकपणा आम्हाला अगदी हवाच होता.

संगीतकार हर्ष - विजय यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ हा आमचा पहिलाच चित्रपट असल्याने हा अनुभव विशेष आहे. आम्ही महाराष्ट्राच्या लोककलेत वाढलो, त्याच आवाजात गाणी तयार केली आणि तीच कला मोठ्या पडद्यावर पोहोचवण्याची संधी मिळणं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हेमंत ढोमे यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

१ जानेवारी २०२६ पासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत. सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार असून अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर यांच्यासह प्राजक्ता कोळी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.