बिग बॉस मराठी ६ : पहिल्याच ‘भाऊचा धक्का’ मध्ये रितेश देशमुखांनी केली तन्वी कोलतेची कानउघडणी

बिग बॉस मराठी ६ : पहिल्याच ‘भाऊचा धक्का’ मध्ये रितेश देशमुखांनी केली तन्वी कोलतेची कानउघडणी

मुंबई - बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची जोरदार सुरुवात झाली असून अवघ्या पहिल्या आठवड्यात घरात राड्यांची मालिका पाहायला मिळतेय. प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो पहिला ‘भाऊचा धक्का’ अखेर आज, १७ जानेवारी रोजी पार पडणार आहे. पहिल्याच आठवड्यात काही स्पर्धकांनी घरात गोंधळ घातला असून त्यात सर्वाधिक चर्चेत राहिली ती तन्वी कोलते. पहिल्या दिवसापासूनच तन्वी मोठ्यांशी उद्धटपणे बोलताना, सतत वाद घालताना आणि मनासारखं न झालं की रडताना दिसली. या सगळ्या वागणुकीचा आढावा आज रितेश देशमुख ‘भाऊचा धक्का’मध्ये घेणार आहेत. त्यामुळे या धक्क्यावर नेमकी कोणाची शाळा होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या आठवड्याच्या आणि सीझनच्या पहिल्या ‘भाऊचा धक्का’ चा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये रितेश देशमुख पहिल्या आठवड्यात गाजलेल्या स्पर्धकांची चांगलीच कानउघडणी करताना दिसतात. विशेष म्हणजे तन्वी कोलतेने सागर कारंडेच्या प्रोफेशनवर केलेल्या वक्तव्यावरही रितेश काय बोलणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. अखेर आजच्या भागात तो क्षण पाहायला मिळणार आहे.

प्रोमोमध्ये रितेश देशमुख  सर्वांत आधी तन्वीच्या गेमप्लॅनची पोलखोल करतात. संपूर्ण आठवडा प्रेक्षकांमध्ये चर्चेत असलेला मुद्दा त्यांनी थेट मांडला. “खूप बोलणं, मग भांडणं आणि शेवटी रडणं” या सवयीवरून रितेश तन्वीला चांगलंच खडसावतात. रितेश देशमुख पुढे म्हणाले, “तन्वी कोलते किती बोलते! तुम्ही या घराची तंटा क्वीन आहात. तुम्हाला फक्त बोलायचं, भांडायचं आणि ते झालं की रडायचं असतं. तुमच्या जिभेचा ब्रेकच फेल झालेला आहे.” तन्वी स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते, मात्र रितेश तिला थांबवत थेट म्हणतात, “मी बोलतोय ना… एक मिनिट थांबा.” यामुळे संपूर्ण वातावरण अधिकच तापलेलं दिसतं.

या प्रोमोवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. “प्रोमो पाहून खूप भारी वाटतंय”, “याचीच गरज होती, बरं झालं” अशा प्रतिक्रिया देत अनेकांनी रितेश भाऊंच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. तर दुसरीकडे तन्वी कोलतेवर जोरदार टीका होताना दिसतेय. “भांडण करून बिग बॉस जिंकता येतो असं वाटतंय”, “तन्वी किती बोलते”, “आता खरी तंटा क्वीन झालीये”, “सायको आहे तन्वी” अशा आक्रमक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

आता या सगळ्यानंतर घरातील समीकरणं कशी बदलणार आणि तन्वी रितेशांच्या धक्क्यानंतर काय भूमिका घेणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.