मुंबई महापालिकेची धुरा भाजप - शिंदे सेना युतीकडे ; महापौर कधी होणार..?
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, भाजपने 89 जागा जिंकत पुन्हा एकदा सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. यासोबतच गेल्या 25 वर्षांपासून शिवसेना (ठाकरे गट) यांच्या ताब्यात असलेली मुंबई महानगरपालिका भाजप - शिंदे सेना युतीने काबीज केली आहे. निवडणुकीपूर्वी मुंबईचा महापौर कधी आणि कोण होणार, याबाबत जोरदार चर्चा रंगली होती. ठाकरे बंधूंनी मुंबईचा महापौर हा मराठी व्यक्तीच असेल, अशी भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे सुरुवातीला महापौर हिंदू होणार असल्याचं बोलणाऱ्या भाजपला नंतर महापौर मराठीच असेल, हे स्पष्ट करावं लागलं. आता निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा महापौरपदाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेचा महापौर जानेवारी महिन्याच्या अखेरीस निवडला जाण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात नगरविकास खात्याच्या वतीने महापौर पदासाठी सोडत काढली जाणार असून, त्यानंतर सुमारे दहा दिवसांत महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल.
महापौरपदावर भाजपने दावा केला असला तरी, शिंदे सेनेतील काही नेत्यांनीही या पदावर हक्क सांगितला आहे. मुंबई महानगरपालिकेत सत्तास्थापन करण्यासाठी 114 जागांची गरज असून, भाजपकडे एकट्याला बहुमत नाही. त्यामुळे भाजपला शिंदे गटाच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. अशा परिस्थितीत शिंदे गट महापौरपदासाठी किती आक्रमक भूमिका घेतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, निवडणूक निकालात भाजपने 89 जागा, तर ठाकरे गटाने 65 जागा मिळवल्या आहेत. हा निकाल पाहता मुंबईत भाजपने ठाकरे गटाला मोठा धक्का दिल्याचं चित्र आहे.




