शुभमन गिलचे संघात पुनरागमन !
क्रिकेट न्यूज - स्टार फलंदाज शुभमन गिलबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काही काळापासून टी - २० संघाबाहेर असलेला शुभमन गिल पुन्हा एकदा मैदानात परतणार असून, त्याची निवड विजय हजारे ट्रॉफीसाठी पंजाबच्या संघात करण्यात आली आहे. गिलसोबतच अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंग या दोन आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा २०२५ मधील आंतरराष्ट्रीय प्रवास सध्या थांबलेला असला तरी, नव्या वर्षात ‘टीम इंडिया’ पुन्हा अॅक्शनमध्ये दिसणार आहे. जानेवारी महिन्यात भारत न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार आहे. एकदिवसीय संघाची घोषणा अद्याप झालेली नसली तरी, टी - २० संघ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या संघात समाधानकारक कामगिरी न झाल्यामुळे शुभमन गिलला स्थान मिळालेले नाही.
मात्र, राष्ट्रीय संघातून डच्चू मिळाल्यानंतरही गिलसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशनने (PCA) विजय हजारे ट्रॉफीसाठी १८ सदस्यीय संघाची घोषणा केली असून, त्यात शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे. पंजाबचा पहिला सामना २४ डिसेंबर रोजी महाराष्ट्राविरुद्ध होणार आहे.
पंजाबने यंदा संतुलित आणि मजबूत संघ निवडला आहे. प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), नमन धीर, अनमोलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, सनवीर सिंग आणि हरप्रीत ब्रार यांसारखे पॉवर-हिटर आणि अष्टपैलू खेळाडू संघात आहेत. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी गुरनूर ब्रार आणि क्रिश भगत यांच्याकडे असेल.
विशेष म्हणजे, संघाच्या घोषणेमध्ये अद्याप कर्णधाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही, त्यामुळे नेतृत्व कोणाकडे जाणार याबाबत चर्चा रंगली आहे. तसेच शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंग हे तिघेही संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध असतील की नाही, यावरही सध्या प्रश्नचिन्ह आहे. कारण ११ जानेवारीपासून भारत - न्यूझीलंड एकदिवसीय मालिका आणि २१ जानेवारीपासून टी - २० मालिका सुरू होणार आहे.
गेल्या हंगामात पंजाबचा संघ विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला होता. २०२४ - २५ सत्रात अर्शदीप सिंग हा संघाचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला होता. यंदा पंजाब आपले सर्व सात साखळी सामने जयपूरमध्ये खेळणार आहे. छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, गोवा आणि मुंबई हे संघ पंजाबच्या गटात आहेत. साखळी फेरीचे सामने ८ जानेवारीला संपणार असून, त्यानंतर पुढील फेरीचे चित्र स्पष्ट होईल.
पंजाब संघ (विजय हजारे ट्रॉफी) -
शुभमन गिल, अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), हरनूर पन्नू, अनमोलप्रीत सिंग, उदय सहारण, नमन धीर, सलिल अरोरा (यष्टीरक्षक), सनवीर सिंग, रमणदीप सिंग, जशनप्रीत सिंग, गुरनूर ब्रार, हरप्रीत ब्रार, रघु शर्मा, क्रिश भगत, गौरव चौधरी, सुखदीप बाजवा.




