48 संघ, 104 सामने; FIFA World Cup 2026 कुठे आणि कसा पाहणार?
मुंबई (प्रतिनिधी) : जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेला खेळ म्हणजेच फुटबॉल! आणि या फुटबॉलचा महाकुंभ, अर्थात 'फिफा विश्वकरंडक' आता उद्यावर येऊन ठेपला आहे. भारतीय चाहत्यांसाठी ही स्पर्धा शुक्रवारी पहाटेपासून सुरू होणार आहे. यावेळचा विश्वकरंडक अनेक कारणांमुळे ऐतिहासिक ठरणार आहे, कारण आत्तापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विश्वकरंडक असणार आहे.

यावेळच्या विश्वकरंडकाचे आयोजन एका किंवा दोन नव्हे, तर तब्बल तीन देशांमध्ये अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत संयुक्तपणे केले जात आहे. एकूण 48 संघ असणार आहेत, याआधी फक्त 32 संघ असायचे. 16 वेगवेगळ्या जागतिक दर्जाच्या स्टेडियम्समध्ये तब्बल 140 सामने खेळवले जातील.
संघांची संख्या वाढल्यामुळे स्पर्धेच्या रचनेतही मोठा बदल करण्यात आला आहे.
गट रचना (Groups): 48 संघांची विभागणी एकूण 12 गटांत करण्यात आली आहे. प्रत्येक गटात 4 संघ असतील.
साखळी फेरी: सुरुवातीला प्रत्येक संघ आपापल्या गटात 3 साखळी सामने खेळेल.
बाद फेरी (Knockout Stage): साखळी फेरीनंतर थेट 32 संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील.
प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ (12 x 2 = 24 संघ).
सर्व गटांमधील तिसऱ्या स्थानावरील सर्वोत्तम 8 संघ.
गुणतालिकेचे (Points Table) नियम
जर साखळी फेरीअंती दोन किंवा अधिक संघांचे गुण सारखे असतील, तर पुढील नियमांच्या आधारे निर्णय घेतला जाईल. ज्या संघाचा गोल फरक चांगला असेल, त्याला प्राधान्य मिळेल. गोल फरकही सारखा असल्यास, त्या दोन संघांमधील सामन्याचा निकाल पाहिला जाईल. खेळात शिस्त राखणाऱ्या, म्हणजेच कमी कार्ड्स (पिवळे/लाल) मिळालेल्या संघाला पुढे संधी मिळेल. जर वरील सर्व गोष्टींमध्ये बरोबरी झाली, तर अखेर चिठ्ठी (ड्रॉ) टाकून निर्णय घेतला जाईल. साखळी फेरी संपल्यानंतर सुरू होणाऱ्या बाद फेरीत पराभूत होणारा संघ थेट स्पर्धेतून बाहेर पडेल.
भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. या स्पर्धेच्या भारतातील प्रसारणाचे हक्क झी एंटरटेनमेंट एंटरप्राइज लिमिटेडने मिळवले आहेत. टीव्हीवर 'युनाईट8 स्पोर्ट्स' (United8 Sports) या लिनियर टीव्ही चॅनेलवर सामने पाहाता येईल. 'झी5' या अधिकृत ओटीटी प्लॅटफॉर्मवर असेल.




