आशिया कप तोंडावर असताना टीम इंडियाच्या 'या' दिग्गज क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा

आशिया कप तोंडावर असताना टीम इंडियाच्या 'या' दिग्गज क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा

मुंबई - क्रीडा विश्वातून एक मोठी आणि भावनिक बातमी समोर आली आहे. आशिया कप ९ सप्टेंबरपासून सुरू होत असताना, भारताचा अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्रा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्या २५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीला त्यांनी आता पूर्णविराम दिला आहे.

भारतासाठी २२ कसोटी, ३६ वनडे आणि १० टी २० सामने खेळणाऱ्या मिश्रा यांनी आपल्या स्पिनच्या जादूने अनेक सामन्यांचे पारडे फिरवले आहे. त्यांच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमधील एक अनुभवी अध्याय संपला आहे.

निवृत्ती जाहीर करताना मिश्रा म्हणाले, “आज, २५ वर्षांनंतर मी क्रिकेटमधून संन्यास घेत आहे. क्रिकेट माझं पहिलं प्रेम, माझा शिक्षक आणि आनंदाचा स्रोत राहिला आहे. या प्रवासात अनेक अडचणी, शिकवणी आणि प्रेम अनुभवायला मिळालं. बीसीसीआय, हरियाणा क्रिकेट असोसिएशन, माझे प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, सहकारी आणि चाहते यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो.”

आपल्या भावनिक पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिलं - 

“सुरुवातीच्या दिवसांतील संघर्ष, मैदानावरील अविस्मरणीय क्षण आणि या प्रवासातील प्रत्येक टप्पा मला एक क्रिकेटर आणि एक माणूस म्हणून घडवत गेला. आता मी हा अध्याय बंद करतो आहे, पण मनात केवळ कृतज्ञता आणि प्रेम आहे. क्रिकेटने मला खूप काही दिलं आणि आता वेळ आली आहे या खेळाला काहीतरी परत देण्याची.”

अमित मिश्रा यांची कारकिर्द - 

आंतरराष्ट्रीय पदार्पण :

- वनडे – २००३ मध्ये बांगलादेशविरुद्ध

- कसोटी – २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (मोहाली, ५ विकेट्स)

- टी२० – २०१४ बांगलादेशातील वर्ल्ड कपमध्ये

उल्लेखनीय कामगिरी :

- २०१३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ५ वनडे सामन्यांत १८ विकेट्स घेत श्रीनाथ यांच्या विक्रमाशी बरोबरी

- २०१४ टी२० वर्ल्ड कपमध्ये १० विकेट्स

- कसोटीत ७६, वनडेमध्ये ६४ आणि टी२० मध्ये १६ विकेट्स

- शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना : २०१७

- शेवटचा आयपीएल सामना : २०२४ – लखनऊ सुपर जायंट्सकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध

नव्या प्रवासाची सुरुवात - 

निवृत्तीनंतर मिश्रा आता कोचिंग, समालोचन आणि युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये त्यांचा अनुभव आणि समज निश्चितच पुढच्या पिढीला प्रेरणा देणारी ठरेल.