मांडवकरवाडीतील गणेशोत्सव एकात्मतेचा अद्वितीय सोहळा
कोल्हापूर (प्रतिनिधी) - शाहूवाडी तालुक्यातील मोजक्या गावांपैकी मांडवकरवाडी हे एक वेगळेपण जपणारे गाव आहे. कारण गेली तब्बल १८ वर्षे येथे एकच सार्वजनिक गणपती बसवला जातो. आदर्श कला क्रीडा सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ, मांडवकरवाडी यांच्या पुढाकारातून सुरू झालेली ही परंपरा आज ग्रामस्थांच्या हृदयात दृढपणे रुजली आहे.

मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळात विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच क्रीडा उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये गावातील लहानांपासून ते आबालवृद्धांपर्यंत प्रत्येकजण सहभागी होत असतो. एकाच गणपतीमुळे संपूर्ण गाव एकत्र येते, हीच या गणेशोत्सवाची खासियत आहे.
गणेशमूर्ती ही नेहमीच लालबागच्या राजाच्या स्वरूपात असते. सुमारे ५ ते ७ फूट उंचीची ही मूर्ती गावातील श्रद्धा आणि उत्साहाचे प्रतीक मानली जाते. यंदाच्या गणेशोत्सवासाठीची मूर्ती प्राथमिक शिक्षक अशोक धोंडीराम पाटील (वाघवे) यांनी दिली आहे. त्यांच्या या कार्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ त्यांचे विशेष आभार मानत आहेत.
मंडळाच्या कार्यकारिणीत अध्यक्ष आप्पाजी वडिंगकर, उपाध्यक्ष पांडुरंग जाधव, कार्याध्यक्ष विष्णू लावंगरे, सेक्रेटरी पांडुरंग कळंत्रे, सचिव बाजीराव दाष्टे, दूध संस्था सेक्रेटरी पांडुरंग लांवगरे, कृष्णात जाधव विठ्ठल जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंदा यादव,जोतिराम वडिंगकर भावेश पाटील, बाजीराव व्हनागडे, दीपक व्हनागडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते दिवस-रात्र मेहनत घेतात. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा उत्सव यशस्वीपणे पार पडतो.
गेल्या १८ वर्षांच्या प्रवासात मंडळाने केवळ गणेशोत्सव साजरा केला नाही, तर गावाच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनात मोलाचे योगदान दिले आहे. शैक्षणिक मदत, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक उपक्रमांद्वारे मंडळाने गावातील युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना एकत्र आणले आहे.
मांडवकरवाडीचा गणेशोत्सव हा फक्त धार्मिक सोहळा नसून एकात्मता, समाजबंध आणि संस्कृती जपणारा उत्सव ठरतो. त्यामुळेच मांडवकरवाडीचा हा गणपती उत्सव आजूबाजूच्या परिसरातही विशेष दखल घेण्याजोगा ठरला आहे.




